Vijay Hazare Trophy: बिहार क्रिकेट संघाने क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला आहे. विजय हजारे ट्रॉफीतील (Vijay Hazare Trophy) पहिल्याच सामन्यात बिहारने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 50 षटकांत 6 गडी गमावत तब्बल 574 धावांचा डोंगर उभारला आहे. लिस्ट-ए क्रिकेटमधील हा आजपर्यंतचा सर्वोच्च संघस्कोअर ठरला असून, या विक्रमी डावात बिहारच्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी साकारली.

रांची येथे झालेल्या या सामन्यात बिहारच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. सलामवीर वैभव सूर्यवंशीने पहिल्या विकेटसाठी 158 धावांची खेळी करत भक्कम पाया घातला. वैभवने अवघ्या 84 चेंडूंमध्ये 190 धावांची विस्फोटक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यापूर्वी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावांचा विक्रम तमिळनाडूच्या नावावर होता. तमिळनाडूने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 2 गडी गमावून 2022 मध्ये 506 धावा केल्या होत्या. तब्बल तीन वर्षांनंतर बिहारने याच संघाविरुद्ध तो विक्रम मोडीत काढत अव्वल स्थान पटकावले आहे.

बिहारकडून वैभव सूर्यवंशी (190), यष्टिरक्षक-फलंदाज आयुष लोहारुका (116) आणि कर्णधार साकिबुल गनी (128) यांनी शतकी खेळी करत सामन्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवले. बिहारच्या डावात तब्बल 49 चौकार आणि 38 षटकार लगावले गेले.
या सामन्यात पूर्णपणे वैभव सूर्यवंशीचं प्राबल्य राहीलं. त्याने हा विक्रम केवळ14 वर्षे 272 दिवसांच्या वया त शतक झळकावत तो पुरुषांच्या लिस्ट-ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
एकूणच, बिहार संघाची ही विक्रमी कामगिरी आणि वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीतील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक धावा
1) बिहार -574/6 विरुद्ध अरुणाचल प्रदेश (2025)
2) तमिळनाडू- 506/2 विरुद्ध अरुणाचल प्रदेश (2022)
3) मुंबई- 457/4 विरुद्ध पाँडिचेरी (2021)
4) महाराष्ट्र- 427/6 विरुद्ध मणिपूर (2023)
5) पंजाब – 426/4 विरुद्ध हैदराबाद (2025)







