हनुमंत चिकणे
(Uruli Kanchan )उरुळी कांचन, (पुणे) : आजच्या आधुनिक काळात लाल मातीतील कुस्ती आणि पैलवानकी संपुष्टात येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, शिंदवणे (ता. हवेली) येथील पैलवान शरद महाडिक यांनी शिंदवणेसह परिसरातील मुलांना मोफत कुस्तीचे प्रशिक्षण मिळावे या हेतूने “धर्मवीर छत्रपती संभाजीराजे कुस्ती संकुल” या नावाने संकुल सुरू करण्याचा संकल्प केला. त्याचे भूमिपूजन नुकतेच पार पडले आहे.
३० लाख रुपयांचा खर्च…!
या संकुलानासाठी सुमारे ३० लाख रुपयांचा खर्च येणार असून यामध्ये पैलवानांना मॅट व मातीची कुस्ती तसेच मुलींना लाठीकाठी, तलवारबाजी, योगासने, बाहेरील मुलांना राहण्यासाठी या ठिकाणी सोय करण्यात येणार असून खाण्याचीही सोय करण्यात येणार आहे. सुमारे दीड एकर परिसरात संकूलाच्या रिकाम्या जागेत व्हॉलीबॉल व बास्केटबॉलचे मैदान असेल. आत्याधुनिक, सर्व सोयी सुविधायुक्त हे कुस्ती संकूल बनविण्यात येणार असल्याची माहिती शरद महाडिक यांनी दिली. ग्रामीण भागात सर्व सोयी सुविधायुक्त कुस्ती संकुल होणार असल्याने परिसरातील खेळाडूंना याचा नक्कीच फायदा मिळणार आहे.
पुणे परिसरातील अनेक मुलांना महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ कुस्ती शिकण्याची इच्छा तर असते पण आर्थिक स्थितीमुळे किंवा अन्य कारणांमुळे कोल्हापूरला राहू शकत नाहीत. परिणामी त्यांचे कुस्ती शिकण्याचे स्वप्नं अपूर्ण राहते. मुलांची ही गरज ओळखून आपल्याच परिसरात महाडिक यांनी हा प्रकल्प राबविण्याचे ठरविले.
मुली देखील स्वसंरक्षणासाठी सक्षम बनाव्यात यासाठी लाठी प्रशिक्षण तसेच योग प्रशिक्षण मुलींसाठी राबविण्यात येणार आहे. शारीरिक दृष्ट्या लहान वयातच योग्य प्रशिक्षणाद्वारे मुले सक्षम बनतात. हा सर्व हेतू डोळ्यासमोर ठेवून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने आपल्याला प्राप्त ज्ञान पुढील पिढीकडे जावा म्हणून शिंदवणे येथील आपल्या शेतात महाडिक यांनी हा प्रकल्प सुरू केला. यासाठी अंदाजे ३० लाख रुपये खर्च येणार असून सर्वांसाठी हे संकुल लवकरच खुले होणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाचे भूमिपूजन शिवसेना हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पै. शरद महाडिक, सचिन नागवडे, सचिन मचाले, अनिल काळे, गुरुनाथ मचाले, विठ्ठल महाडिक, नरसिंग महाडिक, पैलवान शेखर महाडिक, विकास महाडिक, शुभम महाडिक, विशाल महाडिक, निखिल महाडिक, सागर महाडिक, भरत महाडिक, दीपक महाडिक, बाळासो महाडिक, एकनाथ महाडिक, मीनानाथ महाडिक, अनिल जरांडे, योगेश मांढरे, महेश महाडिक, आकाश महाडिक शिंदवणे गावातील नागरिक उपस्थित होते.
याबाबत बोलताना पै. शरद महाडिक म्हणाले…!
“महाडिक यांनी व्यक्त केला. “कुस्तीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या शिंदवणे गावात कुस्ती संकुल होणार असल्याने समाधान वाटते. या कुस्ती संकूलामध्ये अॉलंपिक दर्जाचे मल्ल निश्चितच घडतील असा विश्वास आहे.”
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ मचाले म्हणाले, “ग्रामीण भागात मोफत कुस्ती संकुल होत असल्याने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वरदान ठरणार आहे. शेतकऱ्यांची मुले कोल्हापूर तसेच इतर ठिकाणी जाऊ शकत नाहीत. ज्यांना कुस्तीची आवड आहे ते खर्च जास्त होत असल्याने आवड असूनही जाता येत नसल्याने हे संकुल नक्कीच फायद्याचे ठरणार आहे.”