लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) हद्दीतील पांडवदंड परीसरात मागील काही वर्षापासुन बंद असलेल्या पोल्ट्रीची भिंत अंगावर पडून दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
यश मयूर काळभोर, (वय- 14, रा. पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती, ता. हवेली) व प्रथमेश संदीप बोरुडे (मयूर वय- १५ रा. सदर मूळ रा. देवकर वस्ती वार्ड नंबर – ७, श्रीरामपूर, अहमदनगर) अशी मृत्यू झालेल्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलांची नावे आहेत. तर भिंत पडत असल्याची जाणीव होताच, भिंतीजवळ उभे असलेले यशचे वडील मयूर गजानन काळभोर व त्यांचा मित्र सुनील वसंत चव्हाण हे दोघेजण वेळीच बाजूला झाल्याने त्यांचे प्राण वाचले. ही दुर्देवी घटना गुरुवारी (ता. २१) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
स्थानिक नागरीकाकांडून मिळालेल्या माहितीनुसार, मयूर काळभोर यांची पांडवदंड परिसरात जुनी पोल्ट्री होती. ही पोल्ट्री साफ करण्याचे काम मागील दोन दिवसांपासून सुरु होते. दोन दिवसांपूर्वी मयुर काळभोर यांनी पोल्ट्रीवरील पत्रे काढून ठेवले होते. तर आज (गुरुवार) सकाळपासूनच मयूर काळभोर, सुनिल चव्हाण या दोघांसह यश व प्रथमेश हे चारजण पोल्ट्रीमधील साहित्य व जागेची साफसफाई करत होते.
ही साफसफाई सुरु असतानाच दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक भिंत कोसळल्याने या भिंतीच्या बाजूला उभे असलेले यश काळभोर व प्रथमेश बोरुडे हे त्या भिंतीखाली गाडले गेले. तर भिंत पडत असल्याचे लक्षाच आल्याने व लागलीच बाजूला झाल्याने मयूर काळभोर आणि सुनील चव्हाण हे दोघेजण भिंतीखाली जाण्यापासून वाचले.
दरम्यान भिंतीखाली दोन मुले अडकल्याचे लक्षात येताच, मयूर काळभोर व त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी तात्काळ भिंत हटविण्याचे काम सुरु केले. भिंतीखाली गाडल्या गेलेल्या वरील दोन्ही मुलांना तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पीटल या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचेही निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
View this post on Instagram
दरम्यान या दुर्देवी घटनेत मृत्युमुखी पडलेला यश काळभोर हा कदमवाकवस्ती येथील रायलकर हॉस्पीटल शेजारी असलेल्या टायग्रीस स्कूल या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. तर त्याचा मित्र प्रथमेश बोरुडे हा लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होता. दोन्ही शाळकरी मुलांचा मृत्यू, तोही बापाच्या डोळ्यादेखत झाल्याने लोणी काळभोर व परिसरात शोककळा पसरली आहे.