पुणे : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची T20 मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा सामना आज खेळला जाणार आहे. दुसऱ्या T20 सामन्याप्रमाणे या सामन्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
भारतीय वेळेनुसार तिसरा T20 सामना आज रात्री ८ वाजता सुरू होणार होता. मात्र त्यात दीड तासाने बदल करण्यात आला आहे. नाणेफेक ९ वाजता होईल तर सामना रात्री ९.३० वाजता सुरू होईल. कालच्या सामन्यात खेळाडूंना आराम मिळाला नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला. बीसीसीआयने स्वतः ही माहिती दिली आहे.
मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या वेळेतही बदल करण्यात आला होता. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार होता, परंतु नाणेफेक तीन तास उशिराने सुरू झाली. संघाचे लगेज वेळेवर पोहचणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी सकाळी भारत-वेस्ट इंडिज संघाला अद्याप अमेरिकेचा व्हिसा मिळालेला नसल्याची बातमी आली होती. या मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहेत, ज्यासाठी टीम इंडिया तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर रवाना होणार आहे. मात्र अद्यापपर्यंत दोन्ही संघातील खेळाडूंना व्हिसा मिळालेला नाही.
दुसरा सामना शेवटच्या षटकापर्यंत ताणला गेल्याने तिसरा सामनाही तितकाच रंजक होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. वॉर्नर पार्कची खेळपट्टी तटस्थ असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे याठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही चांगली मदत मिळण्याची अपेक्षा आहे. काल झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजच्या गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही खेळपट्टीने मदत केल्याचे दिसले.
सामन्याच्या दिवशी ताशी पाच ते सात किलो मीटर वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे. तर, तापमान २७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. खेळादरम्यान पावसाची शक्यता नाही. मात्र, वेस्ट इंडीजचे हवामान लहरी स्वरुपाचे असल्यामुळे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर आश्चर्य वाटणार नाही.
भारत संभाव्य संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग.
वेस्टइंडीज संभाव्य संघ:
कायले मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डेव्हॉन थॉमस (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, अकील होसेन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, ओबेड मॅकॉय.