लहू चव्हाण
पाचगणी : पर्यटन नगरी पाचगणी शहरातील कै. भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर उद्यापासून कबड्डी स्पर्धांचा थरार रंगणार असून कब्बडी शौकिकांना राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची मेजवानी मिळणार आहे.
महाराष्ट्र कबड्डी संघटना व सातारा जिल्हा कबड्डी संघटना यांच्या मान्यतेने भाऊसाहेब भिलारे क्रीडांगण येथे व्यायाम मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन १० ते १५ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे.
उद्या (१० जानेवारी) सकाळी साडेनऊ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, मॅप्रो फुड प्रॉडक्टस् उद्योजक मयूर व्होरा, पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद पांचगणी सर्व आजी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष व्यवसायिक आणि महिला गटामध्ये २४ संघ, जिल्हास्तरीय १२५ संघ तर हौशी ६५ किलो वजनी गटात ५० संघ सहभागी होणार आहेत. राज्य पातळीवरील व्यवसायीक पुरुष संघाला ७५ हजार रुपये व चषक, महिला संघाला ४५ हजार रुपये व चषक पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.
तसेच उपविजेत्या आणि उपांत्य फेरीतील संघांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ‘मालिकावीर’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. क्रीडांगणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून यू ट्यूब – लाईव्ह प्रक्षेपण त्याचबरोबर डिजीटल स्कोर बोर्ड व स्क्रीनचा वापर करण्यात येणार आहे. सहा दिवस चालणाऱ्या या भव्य कब्बडी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पाचगणी व्यायाम मंडळाच्या संचालक व पदाधिकारी गेली महिनाभरापासून झटत आहेत.