मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना यजमान इंग्लंडने १०० धावांनी जिंकला. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (१४ जुलै) लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती पार पडला. या सामन्यात यजमान इंग्लंडने रीस टॉपलीच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे भारताचा १०० धावांनी पराभव केला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका आता १-१ अशी बरोबरीत आली आहे.
इंग्लंडने विजयासाठी दिलेले २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय डावाची सुरुवात निराशादायक झाली. कर्णधार रोहित शर्मा १० चेंडू खेळून एकही धाव न मिळवता बाद झाला. त्यापाठोपाठ शिखर धवन, ऋषभ पंत झटपट बाद झाले. चांगली सुरुवात केल्यानंतर विराट कोहली मोठी खेळी करील अशी अपेक्षा होती. मात्र, तोदेखील १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव २७ धावा करून त्रिफळाचित झाला. त्यापाठोपाठ लगेच हार्दिक पंड्याही पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजा (२९) आणि मोहम्मद शमीने (२३) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भारताला विजयापर्यंत नेणे शक्य झाले नाही.
दरम्यान, इंग्लंडसाठी या सामन्याचा हिरो रीस टॉप्ली ठरला. त्याने ९.५ ओव्हरमध्ये २४ धावात ६ विकेट्स घेत भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. टॉप्लीने रोहित शर्मा, शिखर धवन, सूर्यकुमार यादव या फलंदाजांच्या विकेट घेतल्या. शेवटी मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांचीही विकेट त्याने काढली.