पुणे : टी-२० विश्वचषकात ग्रुप ब मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या आहेत. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी १८५ धावा करायच्या आहेत.
भारताने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माला (२) स्वस्तात गमावले. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी डाव सावरत पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली.
केएल राहुलने सेट झाल्यावर गिअर बदलला. त्याला विराट कोहली चांगली साथ देत होता. राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश पुसून काढत अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याची ही ३२ चेंडूत केलेली अर्धशतकी खेळी शाकिबने लगेचच संपवली. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत आक्रमक ३० धावांची खेळी केली.
दरम्यान, अखेरच्या षटकात आर. अश्विनने एक षटकार आणि एक चौकार मारत भारताला १८० धावांचा टप्पा पार करून दिला. त्यानंतर विराट आणि अश्विनने या षटकात १४ धावा करत भारताला २० षटकात ६ बाद १८४ धावांपर्यंत पोहचवले. विराट कोहलीने ४४ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या.