IND vs SA ODI Series: मुंबई: रविवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक असणार नाही. या कालावधीत तो भारतीय कसोटी संघाशी संबंधित राहील. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची तयारी मजबूत करेल. विशेष म्हणजे राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणारा व्हीव्हीएस लक्ष्मणही या वनडे मालिकेत टीम इंडियाला मार्गदर्शन करताना दिसणार नाही. या एकदिवसीय मालिकेसाठी, बीसीसीआयने टीम इंडियासाठी पूर्णपणे नवीन कोचिंग स्टाफ उपलब्ध करून दिला आहे.
बीसीसीआयने शनिवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आणि तीन दिवसीय मालिकेसाठी कसोटी संघाबरोबर राहतील.
कसोटी मालिकेपूर्वी इंट्रा स्क्वॉड मॅच होणार
भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. याआधी २० डिसेंबरपासून टीम इंडियाच्या कसोटी संघांमध्ये तीन दिवसीय इंट्रा स्क्वॉड मॅच होणार आहे. हा सामना भारतीय खेळाडूंसाठी कसोटी मालिकेपूर्वी सराव सामन्यासारखा असेल. भारतीय कसोटी संघातील सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत.
एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक कोण?
बीसीसीआयने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे, ‘दक्षिण विरुद्धच्या वनडे मालिकेत टीमला इंडिया A चा कोचिंग स्टाफ मदत करेल. त्यात फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक राजीव दत्ता आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा असतील.’ तिघेही दक्षिण आफ्रिकेत आहेत.