T20 World Cup 2026 : आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय भक्कम संघाची घोषणा केली आहे. येत्या ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेच्या यजमानपदाखाली या महाकुंभाचा थरार रंगणार आहे. मात्र, या निवडीमध्ये अनेक स्टार खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाही. विशेष म्हणजे, ज्या खेळाडूंची निवड झालेली नाही, त्यातून जर एक स्वतंत्र ‘प्लेइंग इलेव्हन’ तयार केली, तर तो संघ सध्याच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो, अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

निवड समितीने जाहीर केलेल्या मुख्य संघात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, आणि हार्दिक पांड्या यांसारख्या खेळाडूंना स्थान मिळाले असले, तरी अनेक अनुभवी नावे या यादीतून गायब आहेत. या दुर्लक्षित खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनवर नजर टाकल्यास, सलामीला यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांची जोडी दिसते. या संघाचे नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवले जाऊ शकते. मधल्या फळीत केएल राहुल, जितेश शर्मा आणि यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत हे संघाल मजबूती प्रदान करतात. ऋषभ पंतसारखा स्फोटक फलंदाज विश्वचषक संघात नसणे ही चाहत्यांसाठी मोठी चकित करणारी बाब ठरली आहे.

अष्टपैलू खेळाडू म्हणून या पर्यायी संघात नितीश कुमार रेड्डी आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश होतो. फिरकीची धुरा अनुभवी युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई या जोडीकडे असेल. विशेषतः चहलसारख्या चतुर फिरकीपटूला मुख्य संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वेगवान गोलंदाजीच्या विभागात मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज ही अनुभवी जोडी कोणत्याही फलंदाजीचा कणा मोडून काढण्यास समर्थ आहे. एकंदरीत, मुख्य संघ निवडताना निवडकर्त्यांनी युवा रक्ताला प्राधान्य दिले असले, तरी ‘बाहेर’ राहिलेल्या खेळाडूंची ताकदही कमी नाही, हेच या प्लेइंग इलेव्हनवरून स्पष्ट होत आहे.








