गेबेरहा: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 मालिका खेळत आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसरा टी-20 सामना गेबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादव भारताकडून T20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. याशिवाय टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला.
सूर्यापूर्वी विराट कोहलीने टी-20 मध्ये भारतासाठी सर्वात जलद 2000 धावांचा टप्पा गाठला होता. तर T20I मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 52 डावात 2000 धावांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर या यादीत पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान देखील संयुक्त पहिल्या स्थानावर आहे, ज्याने या फॉरमॅटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 52 डाव घेतले.
त्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव संयुक्तपणे दुसऱ्या आणि केएल राहुल तिसऱ्या स्थानावर आहे. सूर्याने 56 टी-20 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या, तर केएल राहुलने 58 डावांमध्ये हा आकडा पार केला. तर विराट कोहलीने T20I मध्ये 56 डावांत 2000 धावा केल्या, त्याच्याशी सूर्यकुमार यादवने बरोबरी केली.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारे फलंदाज
52 डाव – बाबर आझम
52 डाव – मोहम्मद रिझवान
56 डाव – विराट कोहली
56 डाव – सूर्यकुमार यादव*
58 डाव – केएल राहुल.
T20I मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने आतापर्यंत 107 डावांमध्ये 4008 धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित शर्मा भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा, केएल राहुल तिसरा आणि सूर्यकुमार यादव चौथा फलंदाज ठरला आहे.
4008 धावा – विराट कोहली (107 डाव)
3853 धावा – रोहित शर्मा (140 डाव)
2256 धावा – केएल राहुल (68 डाव)
2000* धावा – सूर्यकुमार यादव (56 डाव).