मुंबई: टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला आहे. तो किमान 7 आठवडे मैदानापासून दूर राहणार असल्याचे वृत्त आहे. सूर्यकुमार यादवच्या घोट्याची दुखापत गंभीर आहे. अशा स्थितीत तो फेब्रुवारीपर्यंत क्रिकेटच्या मैदानात परतू शकणार नाही.
इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सूर्यकुमार यादव गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतला, तेव्हा त्यांच्या घोट्याचे स्कॅनिंग करण्यात आले होते. त्यात ग्रेड-2 लेव्हल टियर आढळून आली. अशा स्थितीत दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता, जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत तो भाग घेऊ शकणार नाही.
अफगाणिस्तान विरुद्धची मालिका टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची शेवटची टी-20 मालिका आहे. टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी टीम इंडियासाठी योग्य संयोजन शोधण्यासाठी ही एकमेव मालिका शिल्लक आहे. अशा परिस्थितीत सूर्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीला काही प्रमाणात फटका बसणार आहे.
जोहान्सबर्ग T20 मध्ये ही दुखापत झाली.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्याच्या घोट्याला दुखापत झाली. या सामन्याच्या पहिल्या डावात सूर्याने अप्रतिम शतक झळकावले होते. यानंतर जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीला आला तेव्हा तिसऱ्या षटकात फलंदाजाने मारलेला फटका रोखल्यानंतर चेंडू फेकताना त्याला ही दुखापत झाली.
यानंतर फिजिओने त्याला तत्काळ मैदानाबाहेर नेले. उपकर्णधार रवींद्र जडेजाने उर्वरित सामन्यात टीम इंडियाची कमान सांभाळली. टीम इंडियाने हा सामना 106 धावांनी जिंकला आणि सूर्यकुमार यादव ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. सामन्यानंतर जेव्हा सूर्यकुमार यादवला त्याच्या दुखापतीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने मी ठीक आहे असे उत्तर दिले. मी चालू शकतो. म्हणजे दुखापत फारशी गंभीर नाही.