IND vs SA कोलकाता: भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. विराट कोहली 121 चेंडूत 101 धावा करत नाबाद राहिला. त्याचवेळी, रवींद्र जडेजा 15 चेंडूत 29 धावा करून नाबाद राहिला. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्माने शुभमन गिलसह 35 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. रोहित २४ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.
शुभमन गिल २४ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. 93 धावांवर दोन विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 134 धावांची भागीदारी केली. श्रेयस ८७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून बाद झाला. केएल राहुल काही विशेष करू शकला नाही. त्याला केवळ आठ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने 14 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने जलद 22 धावा केल्या.
विराटने 49 व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. 121 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याचवेळी जडेजाने 29 धावांच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. विराटचे हे ४९ वे शतक होते. त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.