वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. मागच्या पर्वात अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला होता. त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यात दक्षिण अफ्रिकेला यश आलं आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत चार पैकी चार सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा विजयरथ बाद फेरीत दक्षिण अफ्रिकेने रोखला आहे. त्यामुळे सातव्यांदा जेतेपदाचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. आता न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाशी अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिका भिडणार आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 गडी गमवून 134 धावा करून दक्षिण अफ्रिकेपुढे विजयासाठी 135 धावांचं आव्हान उभं केलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 17.2 षटकात 2 गडी गमवून पूर्ण करून थाटात अंतिम फेरीत धडक मारली आहे.
या धावांचा पाठलाग करताना लॉरा वॉल्ववॉर्ड्ट आणि तझमीन ब्रिट्स जोडीने सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 25 धावा जोडल्या. पण एनाबेल सुथरलँडच्या गोलंदाजीवर तझमीन ब्रिट्सचा त्रिफळा उडला आणि 15 धावांवर डाव आटोपला. पण त्यानंतर आलेल्या अनेके बॉशने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची खूप धुलाई केली. अनेके बॉशने 31 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ही जोडी लवकर फोडण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जमलं नाही. लॉराने 37 चेंडूत 42 धावा केल्या आणि बाद झाली. तोपर्यंत सामना विजयी दृष्टीक्षेपात आला होता. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 96 धावांची भागीदारी केली. अनेके बॉशने 48 चेंडूत नाबाद 74 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 8 चौकार आणि 1 षटकार मारला.
ऑस्ट्रेलियाचा डाव..
ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या षटकात धक्का बसला. ग्रेस हॅरिस 3 धावांवर असताना बाद झाली. त्यानंतर जॉर्जिया वारेहमही जास्त वेळ तग धरू शकली नाही. 5 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर बेथ मूनी आणि तहिला मॅकग्राथ या जोडीने डाव सावरला. दोघांनी मिळून 50 धावांची भागीदारी केली. तहिला 27 धावा करून बाद झाली. त्यानंतर एलिसा पेरी ही बेथ मूनीच्या जोडीला आली. तिने आक्रमक खेळी केली. 23 चेंडूत 2 चौकार मारत 31 धावा केल्या. तर बेथ मूनी 44 धावा करून बाद झाली. तर तीन चौकारांसाह फोइबे लिचफिल्डने 9 चेंडूत 16 धावा केल्या.