डंबुला (श्रीलंका): महिला आशिया कपमध्ये भारतीय महिला संघाने शानदार सुरुवात केली आहे. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या महिला संघाचा सात गडी राखून पराभव केला. डंबुलामध्ये खेळला जाणारा हा सामना पूर्णपणे भारताच्या हातात होता. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तान संघाला 108 धावांवर रोखले. यानंतर 35 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. महिला आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर एकूण 12 वा विजय आहे.
आशिया चषकात शुक्रवारी भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात सामना रंगला. श्रीलंकेत खेळल्या जात असलेल्या महिला आशिया कपमध्ये पाकिस्तानची कर्णधार निदा दार हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला नाही. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला पूर्ण 20 षटकेही खेळू दिली नाहीत आणि 19.2 षटकांत त्यांचा डाव 108 धावांवर रोखला.
पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने सर्वाधिक 25 धावा केल्या. तूबा हसन आणि फातिमा हसन यांनी प्रत्येकी 22 धावांची खेळी केली. या तिघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा गाठता आला नाही. मुनिबा अली 11, निदा दार 8, आलिया रियाझ 6 आणि गुल फिरोझा 5 धावा करून बाद झाले. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 बळी घेतले. रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
गोलंदाजांनी पाकिस्तानला स्वस्तात बाद केल्यानंतर भारतीय फलंदाजांची वेळ आली. सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी आपल्या संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी 9.3 षटकात 85 धावा केल्या. मात्र, भारताचे दोन्ही सलामीवीर या बाबतीत दुर्दैवी ठरले की, त्यांना अर्धशतक पूर्ण करता आले नाही.
स्मृती मानधना 31 चेंडूत 45 धावा करून बाद झाली. शेफाली वर्माने 29 चेंडूत 40 धावांची खेळी केली. हेमलताने 11 चेंडूत 14 धावा केल्या. हे बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (5) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (3) यांनी विजयी लक्ष्य गाठले. भारताने 14.1 षटकात 3 गडी गमावून सामना जिंकला.