मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2024 ची तयारी अतिशय वेगाने सुरू आहे. या हंगामाचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयपीएल 2024 च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संघाने श्रेयस अय्यरला पुन्हा कर्णधार बनवले आहे. दुखापतीमुळे अय्यर गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत नितीश राणा याला कर्णधार बनवण्यात आले होते.
केकेआरने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी माहिती शेअर केली आहे. नितीश राणाच्या जागी संघाने अय्यरला पुन्हा कर्णधार बनवले आहे. दुखापतीमुळे अय्यर गेल्या मोसमात खेळू शकला नव्हता. यामुळे नितीशने संपूर्ण हंगामात कर्णधारपद भूषवले. आता अय्यरच्या पुनरागमनाने त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. नितीशला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अय्यर हा अनुभवी खेळाडू असून त्याने अनेक प्रसंगी संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे.
कर्णधार झाल्यानंतर श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली. त्याने नितीश राणा यांचेही कौतुक केले. अय्यर म्हणाला, “गेला हंगाम आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होता. नितीश याने त्याची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. माझी जागा भरून काढण्याबरोबरच त्याने कर्णधार म्हणूनही चांगले काम केले. केकेआरने त्याला उपकर्णधार बनवले याचा मला आनंद आहे. त्याच्यामुळे संघाची ताकद वाढेल यात शंका नाही.
आयपीएल 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये KKR 7 व्या क्रमांकावर होता. त्यांनी 14 सामने खेळले आणि 4 जिंकले. केकेआरलाही 8 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. रिंकू सिंगने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. रिंकूने 14 सामन्यात 474 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 4 अर्धशतके झळकावली.