मुंबई: धावांसाठी झगडणारी सलामीवीर शफाली वर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय महिला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. भारताच्या १६ खेळाडूंच्या संघात हरलीन देयोल, रिचा घोष, मिन्नू मनी, टिटास साधू आणि प्रिया पुनियाचे पुनरागमन झाले आहे, तर उमा छेत्री, दायलना हेमलता, श्रेयांका पाटील आणि सायली सातपुते यांना वगळण्यात आले आहे.
लय गमावलेल्या २० वर्षीय शफालीला गत सहा महिन्यांत १०८ धावा काढता आल्या आहेत. यामध्ये ३३ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरोधात घरच्या मैदानातील एकदिवसीय मालिकेच्या मध्यामधूनच शफालीला बाहेर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांनी बंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिका विरोधातील मालिकेत तिला पुन्हा संघात स्थान देण्यात आले होते.
जुलै, २०२२ मध्ये शफालीने श्रीलंकाविरोधात एकदिवसीय मालिकेत अखेरचे अर्धशतक झळकावले होते. गत महिन्यात न्यूझीलंड विरोधातील मालिकेत भारताला २-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. शफालीची या मालिकेतील आकडेवारी ३३, ११, १२ अशी निराशजनक आहे. अपयशाच्या गर्तेत अडकल्यामुळेच शफाली संघातून स्थान गमावून बसली आहे. भारतीय संघ ५ ते ११ डिसेंबरदरम्यान, ब्रिस्बेन आणि पर्थ येथे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल. भारतीय संघ पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे विमान पकडेल.