ऍडलेड : न्यूझीलंडला ७ गडी राखून नामविताना भारताचा परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान टी २० विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत पोचला असून, आज होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीतील विजेत्यासोबत विजेतेपदासाठी त्याला दोन हात करावे लागणार आहेत. आजच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारत व इंग्लंड हे दोन्ही संघ समोरासमोर असतील. यातील लढतीतील विजेत्यांचे आव्हान अंतिम फेरीत पाकिस्तान समोर असणार आहे.
काल झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाला ७ गडी राखून पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आजच्या लढतीमध्ये पाकिस्तान सोबत कोणता संघ अंतिम सामना खेळणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.
सुपर १२ साखळीत खेळताना भारतीय संघाने ५ पैकी ४ लढती जिंकताना गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले होते. यावेळी भारताने ८ गुण मिळवताना गटात अव्वल राहण्याचा पराक्रम केला. पूर्ण स्पर्धेत केवळ दक्षिण आफ्रिका संघाने भारताला पराभूत केले होते. तर भारताने पाकिस्तान, नेदरलँड बांगलादेश व झिम्बावे संघाला पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
इंग्लंड संघाने ५ पैकी ३ लढती जिंकताना उपांत्य फेरीत ग्रुप २ मधून उपांत्य फेरी गाठली. इंग्लंडने श्रीलंका, न्यूझीलंड व अफगाणिस्तान संघाना पराभूत केले. तर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण होऊ शकला नाही. आयर्लंड संघाने अनपेक्षित धक्का देताना इंग्लंडला पराभूत केले होते.
आजच्या लढतीत भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अर्शादिप सिंग, भुवनेश्वर कुमार यांच्यावर मदार असणार आहे. ऋषभ पंत व दिनेश कार्तिक यांच्या अंतिम संघात स्थान मिळविण्यासाठी मोठी चुरस आहे. जोस बटलर, बेन स्टोक्स, डेव्हिड मलान, सॅम करण, जोशुवा लिटिल यांच्या खेळावर हा संघ अवलंबून आहे.
सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे.