बंगळुरू : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात टीम इंडियाची हाराकिरी झाली होती. मात्र, आता दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी मैदानात चांगलाच शड्डू ठोकला आहे. एकीकडे अनुभवी विराट आणि रोहित यांच्या संयमी आणि झुंजार खेळीनंतर युवा सुपरस्टार म्हणून उदयाला येणाऱ्या सरफराज खान याने खणखणीत शतक ठोकलं आहे. पहिल्या डावात सरफराज शुन्यावर बाद झाला होता. मात्र, दुसऱ्या डावात सरफराजची बॅट चांगलीच तळपली आहे.
टीम इंडिया पहिल्या डावात 46 धावावंर गार्ड झाली होती. न्यूझीलंडने प्रत्युत्तरात 402 धावा करत 356 भक्कम आघाडी घेतली. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 231 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या बॉलवर विराट कोहलीची विकेट गेली अन् टीम इंडिया पुन्हा संकटात सापडली होती. विराट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतने सरफराजला चांगली साथ दिली अन् टीम इंडियाला पुन्हा उभारी मिळाली आहे. सरफराजने 14 फोर अन् 3 सिक्सच्या मदतीने दमदार शतक ठोकलं आहे. पहिल्यांदा विराट कोहली अन् नंतर ऋषभ पंतसोबत सरफराजने भागेदारी करत भारताचा डाव पुढे नेल.
सरफराजने फक्त 110 बॉलमध्ये आपलं शतक ठोकलं आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. सर्व खेळाडूंनी आणि स्टाफने सरफराजसाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या आहेत. रोहित शर्माच्या चेहऱ्यावर यावेळी मोठा आनंद दिसत होता.
टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.