पुणे प्राईम न्यूज: भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताला अफगाणिस्तानविरुद्ध 8 गडी राखून विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ओपनिंगला आलेला रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू ठरला. कपिल देवचा विक्रम मोडत त्याने 63 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारतीय कर्णधाराने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 131 धावांची खेळी केली. रोहित एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक ७ शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. तर अफगाणिस्तानकडून राशिद खानने सर्वाधिक 2 बळी घेतले.
273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला रोहित शर्मा आणि इशान किशनने जबरदस्त सुरुवात करून दिली. भारताने अवघ्या 11.5 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या होत्या. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 156 धावांची (112 चेंडू) भागीदारी केली. रोहित शर्मासमोर अफगाणिस्तानचे गोलंदाज त्यांच्यासमोर पूर्णपणे हतबल दिसत होते. यादरम्यान रोहितने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला.
दरम्यान, भारताला 18.4 षटकात 156 धावांच्या धावसंख्येवर पहिला धक्का ईशान किशनच्या रूपाने बसला, जो 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 47 धावा (47 चेंडू) करून बाद झाला. राशिद खानने अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर 26 व्या षटकात रशीद खानने चांगली फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्मालाही बाद केले.
यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या जोडीने संघाला विजयी केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीने 55* आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने 25* धावा केल्या. कोहलीच्या डावात 6 चौकारांचा तर अय्यरच्या डावात 1 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. भारताने हा सामना 15 षटके लवकर म्हणजे 35 षटकांतच जिंकला.