अॅडलेड: गुलाबी चेंडूचे सावट मानगुटीवरून उतरल्यानंतर भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरला आहे. मात्र, है मैदान सरावाचे आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय फलंदाजांनी पुनरागमन करण्याच्या उद्देशाने नेटमध्ये लाल चेंडूचा कसून सराव केला. बॉर्डर- गावसकर करंडक मालिकेत शनिवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ ब्रिस्बेनमध्ये पोहोचला आहे; परंतु भारतीय संघाने आपल्या लाल चेंडूतील कौशल्यात सुधारणा करण्यासाठी अॅडलेडमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघाने आपल्या बचावात्मक तंत्रावर आणि चेंडू टाकण्याच्या कौशल्यावर लक्ष केंद्रित केले. भारतीय संघाच्या सरावाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर सार्वजनिक करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) म्हणते, ‘आता भविष्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.’ सूर गमावून बसलेल्या कर्णधार रोहितला गेल्या १२ डावांत एका अर्धशतकासह (५२) केवळ १४२ धावा करता आल्या आहेत. रोहितने भारतीय फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांना तोंड देताना लवकरात लवकर आपली लय परत मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे.
दिवस-रात्र कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या रोहितला दोन डावांत ३ आणि ६ धावा करता आल्या आहेत. पर्थ कसोटीत १६ महिन्यांनंतर शतकाचा दुष्काळ संपवणारा कोहली गुलाबी चेंडूच्या कसोटीतील दोन्ही डावांत यष्ट्यांच्या मागे बाद झाला. ऑफ स्टम्पच्या रणनीतीमध्ये फसलेल्या कोहलीने पूर्ण उत्साहाने सरावात सहभाग घेतला. सराव सत्राच्या सुरुवातीला तो सावधपणे खेळत होता; पण त्यानंतर हळूहळू लयीत दिसून आला. सलामीवीर लोकेश राहुल अधिकच शांत दिसत होता. त्याने आपल्या बचावावर अधिक लक्ष केंद्रित केले, तर ऋषभ पंतने फटके मारण्यास पसंती दर्शवली. पर्थमध्ये १६१ धावा काढणारा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने फटके मारण्याचे धोरण अवलंबले. फलंदाजांच्या दिमतीला थ्रो डाऊन प्रशिक्षक उपस्थित होते.
गोलंदाजीच्या फळीत हर्षित राणा, आकाश दीप, यश दयाल या वेगवान माऱ्या सोबत आणि रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी त्रिकुटाचा समावेश होता. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांसोबत अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने फारसा घाम गाळला नाही. भारतीय संघ बुधवारी ब्रिस्बेनला पोहोचेल.