पुणे : पुरुष टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केली आहे. व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. असून सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सर्व चाहत्यांना धक्का दिला. ट्विटरवर ऑडिओ मेसेज शेअर करुन रॉजर फेडररनं त्याच्या चाहत्यांना निवृत्तीबाबत माहिती दिली आहे.
लंडनमधील पुढच्या आठवड्यातील लेव्हर कप फेडररची शेवटची टेनिस स्पर्धा असेल. रॉजरच्या या निर्णयामुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ट्विट केलेला मेसेजलाही नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचं टेनिस कायम आठवणीत राहील, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
रॉजर फेडररची लोकप्रियता केवळ खंडीभर ग्रँड स्लॅम जेतेपदांमुळे निर्माण झालेली नाही. खरे तर त्या २० जेतेपदांच्या जोरावरच फेडररची महान टेनिसपटूंमध्ये गणना झालेली आहे. पण तो केवळ महान नव्हे, तर ‘लाडका’ ठरतो त्याच्या स्नेहस्निग्ध स्वभावामुळे आणि टेनिस कोर्टवरील त्याच्या किमयागारीमुळे. टेनिस हा ताकदीचा खेळ, पण फेडरर ऐन भरात खेळायचा त्यावेळी कोणी टेनिस कोर्टवर काव्य रचतोय किंवा कुंचल्याचे फटकारे देत एखादे सुंदर चित्र निर्मितोय, असा भास व्हायचा.
निराशा आणि अपयशाच्या क्षणांमध्येही त्याने स्वत:विषयी, प्रतिस्पर्ध्याविषयी किंवा प्रेक्षकांविषयी कटुताभाव चेहऱ्यावर आणले नाहीत. विजयानंदात किंवा क्वचित प्रसंगी पराभवानंतर त्याचा अनेकदा अश्रुपात व्हायचा आणि हा फेडरर लाखोंना आपल्यातला वाटून जायचा. या प्रेमाचे कारण फेडररने या सर्वाना त्याच्या जिंकण्याची सवय लावली होती. ८ विम्बल्डन, ६ ऑस्ट्रेलियन, ५ अमेरिकन आणि १ फ्रेंच अजिंक्यपदे हा त्याच्या देदीप्यमान कारकीर्दीचा दर्शनी पुरावा.
राफाएल नडाल (२२) आणि नोव्हाक जोकोविच (२१) हे त्याला मागे सारून पुढे गेले आहेत. पण तीन ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये प्रत्येकी पाचपेक्षा अधिक जेतेपदे, २००५ ते २०१० या काळात १९ पैकी १८ ग्रँड स्लॅम स्पर्धाची अंतिम फेरी, सर्वाधिक २३७ आठवडे अव्वल स्थानावर विराजमान, सर्वाधिक वयाचा अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू हे फेडररचे विक्रम उर्वरित दोघे मोडण्याची शक्यता नाही. तरीही, पुढील आठवडय़ात रॉड लेव्हर स्पर्धा खेळल्यानंतर तो निवृत्त होईल, तेव्हा टेनिस विश्वाचा ग्रँड सलाम स्वीकारणे मात्र त्यालाही नक्कीच जड जाईल.
दरम्यान, विजय.. ऑस्ट्रेलियन ओपन -६, फ्रेंच ओपन-१ विम्बल्डन-८, अमेरिकन ओपन-५, कारकीर्द..१०३ एकेरीत एकूण जेतेपद, ०८ दुहेरीत एकूण जेतेपद मिळवले आहेत.