IPL 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अखेर 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपद पटकावत इतिहास रचला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या थरारक अंतिम सामन्यात RCB ने पंजाब किंग्जवर 6 धावांनी विजय मिळवला आणि लाखो चाहत्यांची स्वप्नं सत्यात उतरली. या ऐतिहासिक क्षणानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. सोशल मीडियावर, रस्त्यांवर आणि घरोघरी RCB च्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

मात्र या आनंदोत्सवात एक दुःखद घटना घडली आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील एका तरुणाचा आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. मंजुनाथ कुंभारा (वय २५) असे या दुर्दैवी युवकाचे नाव असून तो RCB संघाचा कट्टर चाहता होता. विराट कोहलीला तो आपल्या आयडॉलपेक्षा जास्त, देव मानायचा. आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये RCB ने विजय मिळवल्यानंतर तो अत्यंत आनंदात होता आणि विजय साजरा करताना जोरदार नाचत होता. मात्र अचानक नाचता नाचता तो जमिनीवर कोसळला. मित्रांनी तत्काळ त्याला रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक अहवालानुसार, मंजुनाथचा मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला आहे.

फायनल सामन्याचा थरार आणि RCB चा विजय

या ऐतिहासिक अंतिम सामन्यात RCB ने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 190 धावा केल्या. संघासाठी विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावा केल्या, तर रजत पाटीदार (26) आणि जितेश शर्मा (24) यांनी मोलाची भर घातली. पंजाबकडून विजयासाठी 191 धावांचे लक्ष्य देण्यात आले. प्रत्युत्तरात पंजाब किंग्ज संघाने प्रयत्नांची शिकस्त केली, परंतु ते 20 षटकांत 7 बाद 184 धावांपर्यंतच मजल मारू शकले. पंजाबकडून शशांक सिंगने तडाखेबाज 61 धावा फटकावत सामना रंगतदार केला, पण अंतिम क्षणी संघाला विजय मिळवून देता आला नाही. RCB कडून कृणाल पांड्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत 2 बळी घेतले आणि सामन्याचा निर्णय RCB च्या बाजूने झुकवला.







