बंगळुरू: आयपीएलचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) ने आपल्या संघाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या मोसमात आरसीबीचा संघ नव्या नावाने प्रवेश करेल. 22 मार्च रोजी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी फॅफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाने नवीन नाव घेतले आहे.आरसीबीचा प्रसिद्ध ‘RCB Unbox 2024’ कार्यक्रम मंगळवारी एन चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान संघाचे अधिकृत नाव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असे ठेवण्यात आले.
2014 मध्ये बैंगलोर शहराचे नाव बदलण्यात आले. संघाचे नाव बदलून शहराचे अधिकृत नाव ठेवावे, अशी देशांतर्गत चाहत्यांची दीर्घकाळची मागणी होती आणि यावर्षी आरसीबीने आपल्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली. फ्रँचायझीने या महिन्यात आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ जारी करून नाव बदलण्याचे संकेत दिले होते.
आरसीबीने अधिकृत एक्स-पोस्टवर पोस्ट करून ही माहिती दिली. या पोस्टमध्ये आरसीबीचे नवीन नाव संघाच्या लोगोसह दिसत आहे. आरसीबीने संघाच्या नवीन नावाचा फोटो पोस्ट केला आणि कॅप्शन लिहिले, ‘आमचे आवडते शहर. आम्ही स्वीकारलेला वारसा आणि आता आमच्यासाठी नवीन अध्यायाची वेळ आली आहे. सादर करत आहोत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू. तुमचा संघ, तुमचा आरसीबी’.
दरम्यान माजी कर्णधार विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस हे देखील आरसीबी अनबॉक्स इव्हेंटमध्ये उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत संघाचे नाव बदलण्यात आले. कोहली म्हणाला, इथल्या प्रत्येकाला माहीत आहे की, या लीगचे जेतेपद पहिल्यांदाच जिंकणाऱ्या संघासोबत मी नेहमीच उपस्थित राहीन. या फ्रँचायझीसाठी मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. आयपीएल जिंकताना कसं वाटतं, हे जाणून घेणं हेही माझं स्वप्न आहे. या वर्षी आम्ही ते करू अशी आशा आहे.
The City we love, the Heritage we embrace, and this is the time for our ಹೊಸ ಅಧ್ಯಾಯ.
PRESENTING TO YOU, ROYAL CHALLENGERS BENGALURU, ನಿಮ್ಮ ತಂಡ, ನಿಮ್ಮ RCB!#PlayBold #ನಮ್ಮRCB #RCBUnbox pic.twitter.com/harurFXclC
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 19, 2024