नवी दिल्ली: इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर भारताचे दोन खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. त्यामुळे निवडकर्त्यांना दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात बदल करावे लागले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्फोटक कामगिरी करणाऱ्या फलंदाजालाआता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. पाहुण्या संघाने शेवटच्या दोन दिवसांच्या खेळात पलटवार करत भारताविरुद्ध विजयाची नोंद करण्यात यश मिळवले. पहिल्या डावात 246 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने 190 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ओली पोपने १९६ धावांची खेळी करत संघाला सामन्यात पुढे नेले. 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला नवोदित टॉम हार्टलीने दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्यामुळे केवळ 202 धावा करता आल्या.
पहिली कसोटी हरल्यानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत . मात्र, हा बदल इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे नाही तर खेळाडूंच्या दुखापतीमुळे करण्यात आला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतींमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी निवड समितीने वॉशिंग्टन सुंदर आणि सरफराज खान यांच्या नावाची घोषणा केली आहे. आवेश खानच्या जागी सौरव कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे.
गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारा आणि त्रिशतक झळकावणारा फलंदाज सरफराज खानला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियामध्ये निवड समितीने संधी दिली आहे. इंग्लंड लायन्सविरुद्ध सुरू असलेल्या अनधिकृत कसोटी मालिकेत सरफराजने दुसऱ्या कसोटीत १६१ धावांची शानदार खेळी केली. 2020 रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध मुंबईकडून खेळताना सरफराजने 301 धावांची नाबाद खेळी खेळली होती. या फलंदाजाने 45 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 3912 धावा केल्या आहेत ज्यात 14 शतकांचा समावेश आहे.