पुणे : अंतिम लढतीत मुलांच्या गटात चेतक स्पोर्ट्स संघाने प्रकाशतात्या बालवडकर संघाला तर मुलींच्या गटात राजमाता जिजाऊ संघाने महेशदादा स्पोर्ट्स संघाला पराभूत करताना कै. प्रकाश (बापू) सणस यांच्या स्मरणार्थ, सरस्वती क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
नातूबाग येथील मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या मुलांच्या गटातील अंतिम लढतीत चेतक स्पोर्ट्स क्लब संघाने प्रकाशतात्या बालवडकर संघाला ३६-१६ असे पराभूत केले. चेतक स्पोर्ट्स संघाने मध्यंतराला १८-१२ अशी आघाडी घेतली होती. चेतक स्पोर्ट्स संघाकडून विजय मोहिते, किरण गंगणे, शुभम पाटील व बबलू गिरी यांनी दमदार कामगिरी करतना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून स्वप्नील बालवडकर, बालाजी जाधव, अक्षय बोडके यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.
मुलींच्या गटाच्या अंतिम लढतीत राजमाता जिजाऊ संघाने महेशदादा स्पोर्ट्स संघाला पराभूत २५-२२ असे पराभूत केले. मध्यंतराला राजामाता जिजाऊ संघाने १४-८ अशी ६ गुणांची आघाडी घेतली होती. राजमाता जिजाऊ संघाकडून सायली केरीपाळी व अंकिता जगताप यांनी दमदार चढाया करताना तर सलोनी गजमल, कोमल आवळे यांनी पकडी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
पराभूत महेशदादा स्पोर्ट्स संघाकडून पूजा शेलार व दिव्या गोगावले यांनी चढाया करताना तर दिपाली काजळे व पल्लवी गावडे यांनी पकडी केल्या, परंतू त्या संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरल्या.
स्पर्धेचे बक्षीस वितरण सरस्वती क्रीडा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख, सुरेश खिलारे, उपाध्यक्ष बाप्पू मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, भाजप युवा मोर्चाचे बापू मानकर, संस्थेचे उपाध्यक्ष शंकर कुडले, खजिनदार बाळकृष्ण चव्हाण, भाऊ चव्हाण, राजेंद्र मोरे, नगरसेवक अमोल वालावाडकर, लहू बालवडकर, गणेश कळमकर, जिल्हा कबड्डी संघटनेचे राजेंद्र शिळीमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी, मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने स्पोर्ट्स अकादमी बारामती संघाला ३३-१४ असे पराभूत करतना अंतिम फेरीत प्रवेश केला. महेशदादा स्पोर्ट्स संघाने मध्यंतराला १९-६ अशी १३ गुणांची निर्णायक आघाडी घेतली होती. विजयी संघाकडून पूजा शेलार, दिव्या गोगावले, दिपाली काजळे यांनी दमदार चढाया करताना तर अनुष्का फुगेने पकडी करताना संघाला विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून साक्षी काळे, ऐश्वर्या झाडबुके यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.
मुलींच्या गटाच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत राजमाता जिजाऊ संघाने राजा शिवछत्रपती संघाला ३५-१९ असे १६ गुणांनी पराभूत करताना अंतिम फेरीत दाखल झाले. मध्यंतराला राजमाता जिजाऊ संघाने १७-११ अशी ६ गुणांची आघाडी घेतली.
राजमाता जिजाऊ संघाकडून सायली केरीपाळेने व अंकिता जगताप यांनी दमदार चढाया करताना तर सलोनी गजमल व ऋतुजा निगडे यांनी पकडी करताना संघाला मोठा विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून अंजली मुळे, सिद्धी मराठे व नागीन्द्रा कुरा यांनी देलेली लढत अपुरी ठरली.
मुलांच्या गटाच्या पहिल्या उपांत्य फेरीत चेतक स्पोर्ट्स बालेवाडी संघाने श्रीकृष्ण बाणेर संघाला ४९-१३ असे तब्बल ३६ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला चेतक स्पोर्ट्स संघाने २३-३ अशी २० गुनानाची आघाडी घेतली होती. विजयी चेतक स्पोर्ट्स संघाकडून स्वप्नील बालवडकर, बालाजी जाधव, अक्षय बोडके यांनी चढाया करताना संघाचा गुणफलक हलता ठेवला. कृष्णा शिंदे व राहुल वाघमारे यांनी पकडी करताना संघाच्या विजयात हातभार लावला.
पराभूत श्रीकृष्ण संघाकडून शुभम मुरकुटे, निखील मुरकुटे, मनोज पारखे यांनी दिलेली लढत दिली परंतू ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत.
मुलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रकाशतात्या बालवडकर संघाने भैरवनाथ कबड्डी भोसरी संघाला २५-२४ असे एका गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला भैरवनाथ कबड्डी संघाने ९-८ अशी एका गुणाची आघाडी घेतली. विजयी प्रकाशतात्या संघाकडून विजय मोहिते, किरण गंगणे, शुभम पाटील यांनी दमदार चढाया करताना संघाला आघाडी मिळवून दिली तर बबलू गिरी व कल्पेश थोरवे यांनी पकडी करताना संघाचा गुणफलक हलता ठेवला.
पराभूत भैरवनाथ कबड्डी संघाकडून प्रथमेश फुगे, हर्षद माने, पवन करंडे यांनी चढाया तर राहुल कणसे व ऋषीकुमार शर्माने पकडी केल्या परंतू ते संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले.