गुवाहाटी: पराभवाने या आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरुवात करणारा गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स व राजस्थान रॉयल्सचे संघ उद्या (बुधवारी) विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. कोलकात्याला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभूत व्हावे लागले आहे, तर सनरायझर्स हैदराबादने राजस्थानला पराभूत केले होते. राजस्थानचा संघ नियमित कर्णधाराविना उतरत आहे. संजू सॅमसन मागील सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानावर उतरला होता व या सामन्यातही तो याच भूमिकेत उतरू शकतो.
राजस्थान व कोलकातामध्ये हा बरीबरीचा सामना असेल. दोन्ही संघांच्या हेड टू हेडबाबत बोलायचे झाले तर राजस्थान व कोलकातामध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण २९ सामने झाले आहेत. ज्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी १४-१४ सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. राजस्थान व कोलकाता संघ या हंगामात आपल्या पहिल्या सामन्यात फलंदाजी व गोलंदाजी दोन्ही विभागात आक्रमकता दाखविण्यात अपयशी ठरले आहेत.
राजस्थान आणि कोलकाता दोन्ही संघांनी आतापर्यंत विजयाचे खाते उघडलेले नाही. मात्र, कागदावर कोलकाता संघाचे पारडे जास्त जड दिसून येत आहे. राजस्थानचा प्रभारी कर्णधार रियान परागचीही परीक्षा असेल, कारण पहिल्या सामन्यात तो काही निर्णय घेताना अडखळताना दिसला. राजस्थानसाठी नियमित कर्णधार सॅमसनने इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात उतरून चांगली फलंदाजी केली होती व संघाला सामन्यात कायम ठेवले होते. मात्र, राजस्थानचा संघ बलाढ्य लक्ष्य प्राप्त करू शकला नव्हता.
कोलकात्यासाठी फिरकीपटू वरूण चक्रवर्तीची खराब कामगिरी चिंतेचा विषय आहे. ईडन गार्डन्सवरील खेळपट्टीवर फिल सॉल्ट व विराट कोहलीने वरूणविरूध्द सहजच धावा काढल्या. कोलकात्याला अपेक्षा असेल की, वरुण राजस्थानविरुध्द चांगली कामगिरी करू शकेल. मागील सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणे व सुनील नरेन बाद झाल्यानंतर कोलकात्याची मधली फळी गडगडली होती. वेंकटेश अय्यर व आंद्रे रसेल चुकीचा फटका खेळून बाद झाले होते.
कोलकात्याची नजर एन्निच नॉत्जेंव्या तंदुरूस्तीवर असेल. तो पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज जर तंदुरूस्त घोषित झाला, तर त्याला स्पेंसर जॉन्सनच्या जागी अंतिम अकरामध्ये सामील केले जाऊ शकते. राजस्थानच्या संघाला जर पुनरागमन करायचे असेल, तर त्यांच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मागील सामन्यात त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने चार षटकांत ७६ धावा बहाल केल्या होत्या. तर फझलहक फारूकी व महेश तीक्ष्णाही फलंदाजांवर अंकुश ठेवू शकले नव्हते. या सर्वांकडे गुवाहाटीमध्ये पुनरागमन करण्याची संधी असेल.