नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात 358 धावा झाल्या. अत्यंत निकराच्या या लढतीत कोणाचा वरचष्मा आहे, हे सांगणे बहुतांशी कठीण होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स विजयाच्या जवळ पोहोचली होती, पण एक षटक त्यांना महागात पडले. दिल्लीच्या स्वप्नांचा अखेरच्या षटकात चुराडा झाला.
आयपीएल 2024 चा नववा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. सुरुवातीला राजस्थानची परिस्थिती 10 षटकांत 3 बाद 58 धावा अशी होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रियान पराग (84) याने राजस्थानच्या डावाची धुरा सांभाळली.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसामकडून खेळणाऱ्या रियान परागने गुरुवारी आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. त्याने 45 चेंडूत 84 धावा केल्या. परागने या खेळीत 7 चौकार आणि 6 षटकार मारले. या काळात रियान परागला रविचंद्रन अश्विन (29), ध्रुव जुरेल (20) आणि शिमरन हेटमायर (14) यांची चांगली साथ लाभली.