माऊंट मौनगानुई : भारत व न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या मालिकेतील पहिली लढत पावसाने वाया गेली असल्याने या मालिकेतील केवळ दोनच लढती शिल्लक राहिल्या आहेत. अशातच न्यूझीलंड हवामान खात्याने उद्या रविवारी (दि. २०) होणाऱ्या लढतीत देखील पाऊस बॅटिंग करू शकतो, असा अंदाज वर्तविला आहे.
माऊंट मौनगानुई येथे भारत व न्यूझीलंड यांच्या दरम्यान दुसऱ्या टी-२० लढतीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र येथील हवामान खात्याने दिवसा ९० टक्के आणि रात्री ७५ टक्के पाऊस पडणार असण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने उद्याची लढत कशी होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हवामान खात्याचा अंदाज अचूक आल्यास उद्याचा सामना होण्याची शक्यता कमीच असणार आहे. यामुळे क्रीडाप्रेमींचा हिरमोड होण्याची दाट शक्यता आहे.
उद्याचा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर मात्र, दोन्ही संघ तिसरी लढत जिंकून मालिका खिशात टाकण्याचा प्रयत्न राहील. यामुळे दोन्ही संघात होणारी लढत पाहण्यासारखी नक्की असू शकेल.
भारताचा न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठीचा संभाव्य संघ – : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव सिंग, हर्षल पटेल, मो. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.