मुंबई: राहुल द्रविडने टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला त्यांचे नवे मुख्य प्रशिक्षक बनवले आहे. जूनमध्ये भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिकंल्यानंतर त्याचा कार्यकाळ संपला. त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाला मिळालेल्या या मोठ्या यशानंतर आता राजस्थानने त्याला मुख्य प्रशिक्षक बनवले आहे. याआधी ही कमान श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकाराच्या हाती होती. संगकारा 2021 मध्ये क्रिकेट संचालक म्हणून या फ्रँचायझीमध्ये सामील झाला. मात्र, तो मुख्य प्रशिक्षक नसून राजस्थान रॉयल्सशी संबंधित राहणार आहे. संगकारा कॅरेबियन प्रीमियर लीग आणि एसए 20 लीगमधील फ्रँचायझीचे काम सांभाळेल.
प्रशिक्षक बनताच काम सुरु
राहुल द्रविडने अलीकडेच राजस्थान रॉयल्सच्या फ्रेंचायझीसोबत हा करार केला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, त्याने फ्रँचायझीमध्ये सामील होताच आपले काम सुरू केले आहे. मेगा लिलावापूर्वी संघाच्या नव्या प्रशिक्षकाने खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत चर्चा केली.
विक्रम राठोड सहाय्यक प्रशिक्षक?
अहवालानुसार, राजस्थान रॉयल्स भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांना सहायक प्रशिक्षक म्हणून करारबद्ध करू शकते. राठोड हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील राहुल द्रविडच्या टीमचा एक भाग होते. त्यानंतर 2019 मध्ये बीसीसीआयने त्यांना फलंदाजी प्रशिक्षक बनवले. ही जबाबदारी त्यांनी टी-20 विश्वचषक 2024 पर्यंत पार पाडली.
राजस्थान रॉयल्सशी जुने नाते
राहुल द्रविडचा राजस्थान रॉयल्सशी दीर्घकाळ संबंध आहे. 2012 आणि 2013 च्या मोसमात तो संघाचा कर्णधार होता. 2014 आणि 2015 च्या मोसमात त्याने संघ संचालक आणि मार्गदर्शकाची भूमिका बजावली. एवढेच नाही तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनसोबत काम करण्याचाही त्याला प्रदीर्घ अनुभव आहे. अंडर-19 च्या दिवसांपासून तो द्रविडच्या देखरेखीखाली आहे. 2019 मध्ये त्याला एनसीएमध्ये पाठवण्यात आले, त्यानंतर 2021 मध्ये त्याला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले.
आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्सने ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर या संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. 2022 मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला, परंतु गुजरात टायटन्सकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर गेल्या मोसमात क्वालिफायर २ मध्ये पराभूत होऊन बाहेर पडावे लागले होते. आता द्रविडच्या आगमनानंतर राजस्थान रॉयल्सला टीम इंडियाप्रमाणे ट्रॉफी जिंकण्याची आशा असेल.