चेन्नई : भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये २८० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यामध्ये आर. आश्विन, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, शुभमन गिल हे विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. भारताचा फिरकीपटू आर अश्विनने अष्टपैलू कामिगिरी केली. त्यानं पहिल्या डावात फलंदाजी करताना शतक झळकावलं. त्यानंतर त्याने गोलंदाजीमध्ये सुद्धा आपली कमाल दाखवत करत ६ विकेट घेतल्या. तर जडेजानेही ३ गडी बाद केले. जसप्रीत बुमराहला दुसऱ्या डावात एक विकेट मिळाली.
अश्विनने या कसोटी सामन्यात प्रभावी कामगिरी केली आहे. पहिल्या डावात १३३ चेंडूत ११ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ११३ धावांची शतकी खेळी केली. कसोटी क्रिकेटमधलं हे त्याचं सहावं शतक ठरलं आहे. दुसऱ्या डावात त्यानं गोलंदाजी करताना ६ विकेट घेतल्या. भारताकडून कसोटी सामन्यात पाच विकेट घेणारा तो सर्वात वयस्क गोलंदाजही बनला आहे.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये ५२२ विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250, 300, 350 विकेटचा टप्पा सर्वात वेगाने पार करण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात ५ विकेट घेण्याची किमया त्याने सर्वाधिक वेळा केली असून त्याने आतापर्यंत ३७ वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. एका सामन्यात १० विकेट घेण्याची कामगिरी अश्विनने तब्बल दहा वेळा केली आहे.
अश्विनने पाच विकेट घेण्याच्या बाबतीत शेन वॉर्नला मागे टाकलं आहे. शेन वॉर्ननेसुद्धा ३७ वेळा पाच विकेट घेतल्या होत्या. मात्र कमी सामने खेळल्यानं अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर मुरलीधरन असून त्याने ६७ वेळा अशी कामगिरी केली आहे.