पुणे : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाबने चेन्नई सुपर किंग्ज ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. शेवटच्या चेंडूंवर ३ धावांची गरज असताना सिकंदर रजा याने आक्रमक फटका मारून ३ धावा पळून मिळवल्या.
चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्ज विरूद्धच्या सामन्यात २० षटकात ४ बाद २०० धावा केल्या. चेन्नईकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने सर्वाधिक ५२ चेंडूत नाबाद ९२ धावा केल्या. महेंद्रसिंह धोनीने शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावत चेन्नईला २०० धावांपर्यंत पोहचवले. ऋतुराज गायकवाडने ३७ तर शिवम दुबेने २८ धावांचे योगदान दिले. पंजाबकडून सिकंदर रझा, अर्शदीप सिंग, सॅम करन आणि राहुल चाहरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
पंजाबची आक्रमक सुरुवात..
चेन्नई सुपर किंग्जचे २०१ धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या पंजाबने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंगने ४ षटकात पंजाबला अर्धशतक पार करून दिले. मात्र तुषार देशपांडेने शिखर धवनची १५ चेंडूत २८ धावांची केलेली खेळी संपवली.
त्यानंतर प्रभसिमरनने फटकेबाजी करत पंजाबला ८ षटकात ८० धावांपर्यंत पोहचवले. मात्र २४ चेंडूत ४२ धावांची खेळी करणाऱ्या प्रभसिमरनची रविंद्र जडेजाना शिकार करत पंजाबला मोठा धक्का दिला. यानंतर जडेजाने अथर्व तायडेला १३ धावांवर बाद केले. यामुळे पंजाबची अवस्था ३ बाद ९४ धावा अशी झाली.
यानंतर लिम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. ही अर्धशतकी भागीदारी तुषार देशपांडेने १६ व्या षटकात फोडली. त्याने २४ चेंडूत ४० धावा करणाऱ्या लिम लिव्हिंगस्टोनला बाद केले. यानंतर करन संघाला १७० धावांपर्यंत पोहचवून २९ धावांवर बाद झाला.
दरम्यान, पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन किंग्जमधील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेर सिकंदरने शेवटच्या चेंडूवर ३ धावा पळून काढल्या अन् पंजाबला आपला पाचवा विजय मिळवून दिला.
Wheelchair Cricket : पुण्यात प्रथमच व्हीलचेअर क्रिकेट सुरू; आता महाराष्ट्राची टीम लवकरच होणार सज्ज