Kho- Kho World Cup : खो खो वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून स्पर्धेतील सलामीच्या लढतीत भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताचा सामना नेपाळविरूद्ध झाला. या सामन्यामध्ये भारताने नेपाळला ४२-३७ ने असे पराभूत केले. यासह पहिल्या वहिल्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारताने विजयाने सुरवात केली.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार प्रतीक वायकरने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. भारताने दमदार सुरुवात करत पहिल्या ६० सेकंदातच नेपाळचं त्रिकुट फोडून काढण्यात यश मिळवलं. पहिल्या टर्नमध्ये १ मिनिट शिल्लक असताना भारताने १४ गुणांची मोठी आघाडी घेतली.
एकूण ७ मिनिटांचे ४ डाव खेळवले गेले. पहिल्या डावात भारताने २४ गुणांची भर भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात नेपाळने जोरदार कमबॅक केले. डावाच्या शेवटी दोन्ही संघांचे गुण २४-२० असे होते.
भारतीय संघाने तिसऱ्या डावातही आक्रमण कायम ठेवत ७ मिनिटात भारताने २० गुणांची कमाई करत गुणसंख्या ४२ वर पोहोचवली. नेपाळला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या डावात ४३ गुणांपर्यंत मजल मारायची होती. मात्र नेपाळला ३७ गुणांपर्यंत पोहोचता आलं.
भारतीय खेळाडू चमकले..
या शानदार कामगिरीसह भारताने हा सामना ४३-३७ ने आपल्या नावावर केला. हा भारताचा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला आहे. तर नेपाळला सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना ब्राझीलसोबत होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला असल्याने त्यामुळे भारतीय खेळाडूंचं मनोबल वाढलं असणार आहे. या स्पर्धेत एकूण ४ गट आहेत. या ४ गटात एकूण ५ संघ आहेत. त्यापैकी २ संघ उंपात्यपूर्वी फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.