पुणे : पुणे रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक डॉ. राहुल पाटील यांनी हाफ आयर्नमॅनचा किताब जिंकला आहे.
कोल्हापूर येथे कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयर्नमॅन स्पर्धेचे आयोजन रविवारी (ता.२) करण्यात आले होते. या आयोजित स्पर्धेत डॉ. राहुल पाटील यांनी आयर्नमॅन ७०.३ स्पर्धा ७ तास ५५ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण करून हाफ आयर्न मॅन विजेतेपद जिंकले. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या किमान ९ तास ३० मिनिटांच्या तुलनेत त्यांनी हे लक्ष्य सुमारे 8 तासांत पूर्ण केले.
कोल्हापुरात आयोजित हाफ आयर्न मॅन ७०.३ स्पर्धा ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक मानली जाते, ज्यामध्ये 113 किमी अंतर किमान 9 तास 30 मिनिटांत पूर्ण करावे लागते. यात 1.9 किमी पोहणे, 90 किमी सायकलिंग आणि 21.1 किमी धावण्याच्या शर्यतीचा समावेश आहे. या स्पर्धेत 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ज्यात केवळ 140 स्पर्धकांनी स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली ज्यामध्ये डॉ. पाटील यांनी स्पर्धेत 84वा तर विशिष्ठ वयोगटात 55वा क्रमांक मिळवला.
डॉ. राहुल पाटील यांना रेल्वेमध्ये उत्कृष्ट कामासाठी २०१९ ला महाव्यवस्थापक पुरस्कार आणि दक्षता शिल्ड आणि वर्ष 2022 मध्ये प्रधान वित्त सल्लागार पुरस्कार मिळाला आहे. त्यांना क्रिडा आणि फिटनेसची खूप आवड आहे. त्यांनी गेल्या चार वर्षांत विविध सायक्लोथॉन्स ज्यात 50 किमी, 100 किमी आणि 150 किमी सायकलोथॉनचा समावेश आहे. आणि 10 हाफ मॅरेथॉन स्पर्धाही यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
दरम्यान, डॉ. राहुल पाटील यांनी हाफ आयर्नमॅन स्पर्धेचे जेतेपद जिंकण्यासाठी त्याने गेल्या ६ महिन्यांपासून कठीण परिश्रम घेतले आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा तथा अपर मंडल रेल प्रबंधक बृजेश कुमार सिंह यांनी अभिनंदन केले.तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.