Pune News : पुणे, ता.१२ : चीनच्या धरतीवर तिंरग्याची शान वाढवल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतत आहेत. मराठमोळी स्नेहल शिंदे भारताच्या महिला कबड्डी संघाची सदस्य आहे. मूळची पुण्याची असलेल्या स्नेहलला पुणे विमानतळावर भेटताच तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. स्नेहलने वडील प्रदीप शिंदेंना सुवर्ण पदक दाखवताच त्यांना आनंदाअश्रू आले.
कबड्डी संघामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण जिंकले…
स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे आपल्या सुवर्णपदक विजेत्या मुलीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर दाखल झाले तेव्हा त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यांनी मुलींच्या गळ्यातील मेडल पाहिलं अन् कष्टाचं फळ सार्थक झाल्याची भावना त्यांच्या मनात आली. मुलीला आनंदी पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलीला मिठी मारून ते ओक्साबोक्शी रडले. तिच्या गळ्यात विजयमाला घातली अन् शाब्बासकी दिली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाली आहे.
चीनमध्ये खेळवल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा रविवार म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी समारोप करण्यात झाला. भारताने आशियाई स्पर्धांमध्ये शंभरचा आकडा पार केला. या स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यामध्ये १०७ पदकं जमा झाली आहेत. यामध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश आहे.
दरम्यान, भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भारतातून १२ महिला कबड्डीपटूंची अंतिम निवड झाली होती. या खेळाडूंमध्ये महाराष्ट्रातून एकमेव स्नेहल शिंदेला संधी मिळाली. स्नेहल विवाहित असून तिच्या सासरच्यांनी देखील तिचे स्वप्न साकार करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. आतापर्यंत स्नेहलने चार वेळा कबड्डी संघामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण जिंकले आहे.
यावेळी बोलताना स्नेहल म्हणाली की, मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत आम्ही रौप्य पदक जिंकले होते. त्यामुळे यंदा सुवर्ण जिंकण्याची आमच्यावर मोठी जबाबदारी होती. मागच्या एक वर्षात आम्ही खूप मेहनत केली आणि त्याचे फळ आता सुवर्ण पदकाच्या रूपात मिळाले. मी सुवर्ण जिंकावं हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. २०१४ मध्ये मी दुखापतीमुळे संघाबाहेर झाली होती आणि २०१८ मध्ये देखील हेच झालं. त्यामुळे या पदकाने मला खूप आनंद झाला.