लखनऊ: LSG vs PBKS: IPL 2024 चा 11 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे.लखनऊने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 199 धावा केल्या. केएल राहुल केवळ 15 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, परंतु क्विंटन डी कॉकच्या 54 धावा आणि निकोलस पूरनच्या 21 चेंडूत केलेल्या 42 धावांमुळे लखनऊला मोठी धावसंख्या गाठण्यात यश आले. पंजाबसाठी अर्शदीप सिंग आणि राहुल चहर यांनी महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
पंजाब किंग्जसाठी 200 धावांचे लक्ष्य
लखनऊसाठी केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी डावाची सुरुवात केली. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत होते, पण 9 चेंडूत 15 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीदरम्यान त्याने 1 चौकार आणि 1 शानदार षटकारही लगावला. देवदत्त पडिक्कलचा खराब फॉर्म कायम राहिला, तो केवळ 9 धावा करून बाद झाला. सहाव्या षटकाच्या सुरुवातीला 45 धावांवर लखनऊने 2 महत्वाच्या विकेट गमावल्या होत्या. मार्कस स्टॉइनिसने 2 शानदार षटकार ठोकून लखनऊसाठी मोठ्या धावसंख्येच्या आशा उंचावल्या, पण तो 12 चेंडूत 19 धावा करून बाद झाला.
दरम्यान, निकोलस पूरन क्रीजवर आला, त्याची क्विंटन डी कॉकसोबतची भागीदारी पंजाबच्या अडचणीत वाढ करत होती. पण 54 धावांच्या स्कोअरवर क्विंटन डी कॉकने आपली विकेट गमावली. त्याने 38 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. 15 षटकांत संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावा होती. कागिसो रबाडा 16 वे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर पूरनला बाद केले. पुरनने 21 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकार लगावत 42 धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये क्रुणाल पांड्या नावाचं वादळ आलं. वेगवान किंवा संथ चेंडू असो, क्रुणाल कोणालाही सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. पंड्याने 22 चेंडूत 43 धावांची तुफानी खेळी खेळली आणि लखनऊला 199 धावांपर्यंत नेले.
शेवटच्या 9 षटकात 104 धावा
11व्या षटकापर्यंत लखनऊ सुपर जायंट्सची धावसंख्या 3 बाद 95 धावा होती. मात्र अखेरच्या 9 षटकांत निकोलस पुरन आणि कृणाल पांड्या यांच्या स्फोटक खेळीमुळे लखनऊच्या फलंदाजांनी 104 धावा केल्या. लखनऊच्या फलंदाजांनी या डावात 10 गगनचुंबी षटकार मारून पंजाबच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. अर्शदीप सिंग, राहुल चहर आणि हर्षल पटेल यांनी 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.