पुणे : पुणे सराफ असोसिएशन आयोजित ‘पुणे ज्वेलर्स प्रीमिअर लीग २०२२’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व बालन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन यांच्या हस्ते झाले.
पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, नगरसेविका अश्विनी कदम, धनंजय कर्णिक यांच्यासह स्पर्धेतील सर्व संघमालक, खेळाडू आदी उपस्थित होते.
सहकारनगर येथील शिंदे हायस्कुलच्या क्रिकेट मैदानावर २१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत या क्रिकेट स्पर्धा होणार आहे. १६ पुरुष संघ व दोन महिलांचे संघ असे एकूण १८ संघ या लीगमध्ये सहभागी झाले आहेत.
आठ षटकांचे हे सामने असून, स्पर्धेत एकूण २४५ खेळाडू सहभागी झाले आहेत.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानावर खेळणे गरजेचे आहे. क्रिकेट सारख्या खेळाने पूर्ण व्यायाम चांगला होतो, असे सांगून अमिताभ गुप्ता यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही स्पर्धेत खेळताना खेळ भावना महत्त्वाची असून, ती आपसातील नाते अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची असल्याचे पुनीत बालन म्हणाले.
पुणे सराफ असोसिएशन यंदा ९८ व्या वर्षात पदार्पण करत असून, त्यानिमित्त या क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्याचे रांका यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी खेळाडूंना प्रामाणिकपणे खेळण्यासाठी शपथ देण्यात आली.
सर्व खेळाडूना पुनीत बालन यांच्यातर्फे स्पोर्ट्स किट्स देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश नातू यांनी केले तर आभार अंकित शोंड यांनी मानले.
या संघांचा आहे समावेश
अरिया सिल्वर किंग्ज, अभिनव रायझिंग स्टार्स, दिलीप सोनिग्रा रॉयल्स, गांधी रॉयल अँगल्स, जैनम जायंट्स, केआरए चॅलेंजर्स, सिल्वर स्ट्रायकर्स, नगरकर सुपर किंग्ज, मुंदडा डायमंड इलेव्हन, परमार लायन्स, पीएनजी इलेव्हन ब्लास्टर्स, पुष्पम पलटन्स मेन्स, पुष्पम पलटन्स वूमेन्स, ओसवाल स्मॅशर्स, रांका टायटन्स, राठोड सुपर रायडर्स, आरटीएस मार्व्हल्स, संकेत वॉरियर्स या संघांचा समावेश आहे.