लहू चव्हाण
पाचगणी : मोबाईलमधील खेळ खळणे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे लाल मातीतील मैदानी खेळांचे महत्व पटवून देण्यासाठी व्यायाम मंडळाच्या माध्यमातून कब्बडी खेळाला प्राधान्य दिले आहे. काळाच्या ओघात भिलारे क्रीडांगण आजही तो रसरशीतपणा, रांगडेपणा टिकवून आहे. पालिकेच्या माध्यमातून हे क्रीडांगण आतंरराष्ट्रीय स्तराचे करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. असे प्रतिपादन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले.
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर महाराष्ट्र कबड्डी संघटना व सातारा जिल्हा कबड्डी संघटना यांच्या मान्यतेने व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सहा दिवसीय जिल्हा व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दापकेकर बोलत होते. यावेळी पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, व्यायाम मंडळाचे उपाध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, उद्योजक निकुंज व्होरा,विठ्ठलशेठ गोळे, सुरेंद्र भिलारे, नितीन(दादा) भिलारे, राजेंद्र भिलारे, प्रविण भिलारे, गजानन भिलारे, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना व्यायाम मंडळाचे उपाध्यक्ष नानासाहेब कासुर्डे म्हणाले, लाल मातीतल खरा मर्दानी खेळ म्हणजे कब्बडी खेळ, कबड्डी हा खेळ जिवंत ठेवायचे असेल तर जिव ओतून खेळा, जिव झोकून देऊन खेळा तरच माझ्या पाचगणी व परिसरातील खेळाडू देशाच्या संघात देशपातळीवर खेळेल .
प्रास्ताविकात राजेंद्रशेठ राजपुरे म्हणाले, कबड्डी हा मैदानी खेळ सातासमुद्रापार पोहोचविला आहे. त्यामुळेच कबड्डी खेळाला सुगीचे दिवस दिसून येत आहेत. असा हा मातीतला खेळ आपल्या तरूण मंडळींमध्ये चांगल्या प्रकारे रुजावा या उद्देशाने पाचगणी व्यायाम मंडळ हे सामने भरवत असते.
दरम्यान, प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा हस्ते फीत कापून दिपप्रज्वलन व ध्वजारोहण करण्यात आले. खेळाडू व पंचांची शपथ घेऊन सामन्याला सुरुवात करण्यात आली. उद्घाटनाचे सामने तीन क्रीडांगणावर लववीर क्लब पाचगणी – भैरवनाथ कब्बडी संघ शिंदेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव – तपनेश्वर सेवा मंडळ गोडवली, भिलार कब्बडी संघ भिलार – कार्तिक स्वामी कला क्रीडा मंडळ राजपुरी यांच्यांत रंगले. हा दिमाखदार सोहळा व कब्बडी सामने पाहण्यासाठी पाचगणी व परिसरातील क्रीडा रसिकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन प्रमोद पवार यांनी तर राजेंद्र भिलारे यांनी आभार मानले.