ब्रिजटाऊन : विश्वचषकात युगांडाच्या खेळाडूला सामना निश्चितीचा प्रस्ताव दिल्याचे उघडकीस आले आहे. केनियाच्या माजी क्रिकेटपटूने युगांडाच्या खेळाडूला प्रस्ताव सादर केला होता. मात्र, या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक विभागाला याबाबतची माहिती कळवली. त्यानंतर आयसीसीने कडक पाऊल उचलत केनियाच्या माजी खेळाडूपासून दूर रहावे, असा इशारा दिला आहे.
साखळीतील लढतीत केनियाच्या माजी वेगवान गोलंदाजाने युगांडा संघाच्या सदस्याशी वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. युगांडाच्या खेळाडूने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचे पालन करत उपस्थित आयसीसी अधिकाऱ्यांच्या कानावर हा सर्व प्रकार सांगितला. अधिकाऱ्यांनी यावर तत्काळ कारवाई करत सर्व सहयोगी संघांना केनियाच्या या माजी खेळाडूबाबत सतर्क राहण्यास सांगितले. या प्रकरणात खेळाडूने सामना निश्चितीची तक्रार न करणे हा आयसीसी लाचलुचपत प्रति बंधक संहितेनुसार गुन्हा ठरतो.
२०११ मध्ये भारतात आयोजित एकदिवसीय विश्वचषकात कॅनडाचा यष्टिरक्षक हमजा तारिकशी कथित सट्टेबाजांनी संपर्क साधला होता. हमजाने त्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली होती.