पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकीने संघाने कांस्यपदक जिंकले आहे. कांस्यपदकासाठी सामना भारत आणि स्पेन संघांमध्ये खेळला गेला. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाचा सामना जिंकण्यासाठी आला होता आणि तो यशस्वीही झाला. भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारताचे हे 13 वे पदक आहे.
पहिला क्वार्टर गोलशिवाय संपला
पहिल्या क्वार्टरमध्ये भारत आणि स्पेन यांच्यात जबरदस्त स्पर्धा होती. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गोल करण्याचा सतत प्रयत्न केला, परंतु बचाव चांगला केल्यामुळे पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल दिसून आला नाही.
दुसऱ्या क्वार्टरनंतर 1-1 गोल
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच स्पेनकडून सामन्यातील पहिला गोल पाहायला मिळाला. 18व्या मिनिटाला मार्क मिरालेस पोर्टिलोने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. यानंतर 20व्या मिनिटाला स्पेनला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचे त्यांना गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. 29व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला, पण इथेही गोल झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या हाफच्या शेवटच्या मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीतने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आघाडी घेतली
उत्तरार्धातही भारतीय संघाने आपला दमदार खेळ सुरूच ठेवला. तिसऱ्या क्वार्टरच्या तिसऱ्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला. यावेळीही हरमनप्रीत सिंगने कोणतीही चूक केली नाही आणि भारतासाठी सामन्यातील दुसरा गोल केला, ज्यामुळे भारताने 2-1 अशी आघाडी घेतली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा प्रवास
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव करून आपल्या मोहिमेला सुरुवात केली. यानंतर अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. यानंतर बेल्जियमविरुद्ध 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीय संघाने ऐतिहासिक विजय संपादन केला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रिटनचा 4-2 असा पराभव केला. पण भारतीय संघ उपांत्य फेरीत 2-3 असा पराभूत झाला.