पॅरिस: मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तिच्या पिस्टलमधून निघालेल्या गोळीमुळे भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. यासह भारताच्या पदकांची संख्या 2 झाली आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मनू भाकरने तिचा जोडीदार सरबज्योत सिंहसह भारतासाठी दुसरे पदक जिंकले. 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीत मनू आणि सरबजोत यांनी कोरियन जोडीचा 16-10 असा पराभव केला.
एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी मनू पहिली भारतीय
यापूर्वी, मनू भाकरने 28 जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टलच्या एकेरीत कांस्यपदकावरही निशाणा साधला होता. पॅरिसमध्ये पहिल्या कांस्यपदकासह मनूने पदकतालिकेत भारताचे खाते उघडले. आणि आता, पॅरिसमधील पहिल्या यशानंतर 48 तासांनंतर, मनू भाकरने आणखी एक कांस्य जिंकून इतिहास रचला आहे.
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग 29 जुलै रोजी 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकासाठी पात्र ठरले होते. या दोघांनी पात्रता फेरीत 20 अचूक शॉट्स मारले होते आणि त्याद्वारे त्यांनी 580 गुण मिळवले होते.
मनू भाकर तिची दुसरी ऑलिम्पिक पॅरिसमध्ये खेळत आहे. यापूर्वी तिने टोकियोमध्ये ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा तेथून त्याला रिकाम्या हाताने परतावे लागले होते. टोकियोमध्ये मनू भाकरच्या अपयशाचे कारण तिचा खराब खेळ नसून पिस्टलमधील तांत्रिक बिघाड हे होते. टोकियोमधील अपयशानंतर मनूला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. पण, चांगली गोष्ट म्हणजे मनू भाकर पॅरिसहून रिकाम्या हाताने परतत नाही. स्वत:सोबतच तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाचे खातेही उघडले आहे.