पॅरिस : ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाचा बहुमान दोन कांस्यपदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि कांस्यपदक विजेता हॉकी संघाचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला देण्यात आला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
समारोप सोहळ्यात महिला प्रतिनिधी म्हणून मनूचे नाव याअगोदरच निश्चित झाले होते. मात्र पुरुष प्रतिनिधीसाठी रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि श्रीजेश यांच्यापैकी एकाची निवड आयओएला करायची होती. आयओएच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांनी शुक्रवारी यासंदर्भात नीरजशी संपर्क साधला. श्रीजेश ऑलिम्पिकमधून निवृत्ती घेत असल्याने त्याला मान देण्यात यावा, असे नीरजने अध्यक्षा पी.टी. उषा यांना सांगितले. त्यानंतर उषा यांनी श्रीजेशच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
पी.टी. उषा यासंदर्भात म्हणाल्या, नीरजशी या मुद्द्यावर चर्चा केली. समारोप सोहळ्यात त्याने श्रीजेश हा ध्वजवाहक असावा हे मान्य केले. यावरून नीरजचे कौतुक करावे तेवढे थोडेच. तसेच नीरजला भारतीय खेळांमध्ये श्रीजेशच्या योगदानाचा किती आदर आहे, हे दिसून येते. श्रीजेश गतवर्षीच्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात भारताचा ध्वजवाहक होता. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय चमूचे ध्वजवाहक म्हणून महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि टेबल टेनिसपटू अचंता शरत कमलची निवड करण्यात आली होती. मात्र दोघांनीही निराशा केली.