पॅरिस: भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा 21-18, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. या विजयासह लक्ष्यने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. लक्ष्यने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूविरुद्ध पहिल्या गेममध्ये 8-1 ने जबरदस्त पुनरागमन करत गुणसंख्या 8-8 अशी बरोबरी साधली आणि नंतर मध्यांतराच्या पहिल्या ब्रेकमध्ये ११-९ अशी आघाडी घेतली. यानंतर दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. एका वेळी 18-18 अशी बरोबरी होती. मात्र, त्यानंतर लक्ष्यने स्वतःवर नियंत्रण ठेवत 21-18 असा विजय मिळवला.
पहिला गेम जिंकल्यानंतर लक्ष्यने दुसऱ्या गेममध्येही चांगली सुरुवात केली. मध्यांतराच्या ब्रेकमध्ये लक्ष्य पुन्हा आघाडीवर होता. यानंतर लक्ष्यने दुसरा गेम २१-१२ असा सहज जिंकला. हा सामना 50 मिनिटे चालला. लक्ष्यने पहिला गेम 28 मिनिटांत तर दुसरा गेम 23 मिनिटांत जिंकला. दोन्ही खेळाडूंसाठी ही करा किंवा मरो अशी स्पर्धा होती. पराभूत खेळाडूचा प्रवास पॅरिस ऑलिम्पिकमध्ये संपला असता. अशा स्थितीत लक्ष्यने क्रिस्टीचा पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकमधील आपला प्रवास सुरु ठेवला आहे.