पॅरिस: टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकून देशाला आनंद देणाऱ्या भारतीय हॉकी संघाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही पदकाच्या आशा वाढल्या आहेत. पूल स्टेजमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षक क्रेग फुल्टन आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या संघाने आतापर्यंतचा सर्वोत्तम निकाल साधत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून खळबळ उडवून दिली. पूल स्टेजच्या शेवटच्या सामन्यात, भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक सामन्यात 3-2 असा पराभव केला. यासह भारताने 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला.
या ऑलिम्पिकमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतीय संघासाठी बचावाचे कर्तव्य निभावण्याबरोबरच पेनल्टी कॉर्नर आणि पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत संघाला विजयापर्यंत नेले. ऑलिम्पिक, वर्ल्डकप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये टीम इंडियाला ज्या ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या अनेक वर्षात खूप वेदना दिल्या, तशाच वेदना आज भारताने ऑस्ट्रेलिया दिल्या. अखेर 1972 नंतर पहिल्यांदाच टीम इंडियाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अनेक पराभवांचा बदला घेतला.
एक दिवसापूर्वीच बेल्जियमविरुद्धच्या चुरशीच्या सामन्यात 1-2 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाला ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून कडवे आव्हान होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयाचा एकमेव दावेदार मानले जात होते, पण टीम इंडियाने पहिल्या क्वार्टरपासूनच फ्रंटफूटवर खेळण्यास सुरुवात केली आणि दोन मिनिटांतच दोन गोल करत 2-0 अशी आघाडी घेतली. यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. 12व्या मिनिटाला अभिषेकने संघासाठी मैदानी गोल केला आणि त्यानंतर पुढच्याच मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतनेही पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. ऑस्ट्रेलियावर आघाडी घेतल्यानंतरही टीम इंडियाने कोणतीही बेफिकीरी न करता ऑस्ट्रेलियाचे प्रतिआक्रमणाचे प्रयत्न हाणून पाडले.
ऑस्ट्रेलियाचे पुनरागमनाचे प्रयत्न अयशस्वी
मात्र, 25व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने पहिला गोल करत स्कोअर 2-1 असा केला. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला टीम इंडियाने आपली आघाडी पुन्हा मजबूत केली. यावेळी हरमनप्रीतने 32 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर केले. टीम इंडियाने चौथ्या क्वार्टरमध्ये आणखी एक गोल केला, पण रेफरीने तो फेटाळला. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ब्लेक गोव्हर्सने 55व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत स्कोअर 3-2 असा केला. शेवटच्या 5 मिनिटांत ऑस्ट्रेलियाने आणखी हल्ले केले. पण अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशसह बचाव फळीने हे प्रयत्न हाणून पाडले आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.