पॅरिस: ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त हॉकीचे प्रदर्शन करून भारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीचा सामना 6 ऑगस्ट रोजी होणार आहे, जिथे भारताचा सामना जर्मनीशी होणार आहे. मात्र, त्या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक बातमी चांगली नाही. ज्याची भीती वाटत होती, तीच गोष्ट घडली आहे. उपांत्य फेरीत भारताला त्यांचा सर्वात अनुभवी बचावपटू अमित रोहिदासशिवाय खेळावे लागेल. कारण भारताच्या स्टार डिफेंडरवर 1 सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
अमित रोहिदासवर 1 सामन्याची बंदी
ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय डिफेंडर अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवण्यात आले. खरं तर, सामन्यादरम्यान त्याची हॉकी स्टिक ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूच्या चेहऱ्यावर लागली, ज्यामुळे त्याला रेड कार्ड मिळाले. रेड कार्ड मिळाल्यानंतर अमित रोहिदास त्या संपूर्ण सामन्यातून बाहेर राहिला. आता तो उपांत्य फेरीच्या सामन्यातही खेळणार नाही.
एफआयएचने निवेदन जारी करून काय म्हटले?
आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे, असे एफआयएचने एक निवेदन जारी केले. तो सामना क्रमांक 35 मध्ये म्हणजेच भारत आणि जर्मनी यांच्यातील उपांत्य फेरीत खेळणार नाही. त्याच्याशिवाय उर्वरित १५ खेळाडूंमधून भारताला उपांत्य फेरीसाठी आपला संघ बनवावा लागणार आहे.
अमित रोहिदासला रेड कार्ड कधी मिळाले?
भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्याची घटना घडली. शॉट खेळत असताना त्याची स्टिक ग्रेट ब्रिटनचा खेळाडू विल कॅलननच्या चेहऱ्यावर लागली. मात्र, मैदानावरील रेफरीला काही गंभीर वाटले नाही. त्यांना त्याच्या दुर्लक्ष करायचे होते. पण, ब्रिटिश खेळाडूंनी पुन्हा व्हिडिओ रेफरल घेतला, त्यानंतर अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाले. भारताने उपांत्यपूर्व फेरीतील ग्रेट ब्रिटनविरुद्धचा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा जिंकला. तत्पूर्वी, दोघांमधील सामना चारही क्वार्टरमध्ये 1-1 असा बरोबरीत सुटला.