Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एकापाठोपाठ एक नवे वाद निर्माण होत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची रविवारी (दि.11 ऑगस्ट) सांगता झाली. आता ऑलिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकावरून वाद निर्माण झाला आहे. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकांचा रंग उडून जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकाचा रंग उडाल्याची घटना घडली आहे. ब्रिटनची कांस्य पदक विजेती यास्मिन हार्परने पदकाचा रंग उडाल्याचा दावा केला आहे. यास्मिन हार्परने सोशल मीडियावर रंग निघालेल्या कांस्य पदकाचा फोटोही शेअर केला आहे. यास्मिनने 100 मीटर सिंक्रोनाइस स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांकडून यावर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अमेरिकन कांस्य पदक विजेता नायजा हस्टन याने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत पदकाचा रंग उडाल्याचं म्हटलं आहे. हे ऑलिम्पिक पदक नवे करकरीत असतानाच पाहायला चांगले वाटत होते. पण काही वेळानंतर आपल्या शरीरावरील घाम या पदकावर लागल्यानंतर या पदकाचा दर्जा समोर दिसून येतो. हे पदक मिळून फक्त एक आठवडाच झाला आहे. तरी या पदकाची समोरील बाजू काहीशी उखडू लागली आहे. असं कशामुळे झालं याबद्दल काहीच माहित नाही. कदाचित या पदकाचा दर्जा आणखीन वाढवणे अपेक्षित असल्याचे नायजा हस्टनने म्हटले आहे.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पदकांचा रंग उडून जाणे हा सर्वात मोठा धक्का आहे. पदकं ही खेळाडूंच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे प्रतीक असतात. अशा स्थितीत खराब पदक मिळणे निराशाजनक आहे. या प्रकरणामुळे पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.