दुबई: यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने बुधवारी पुनरागमनाच्या कसोटीत शानदार शतक झळकावून आयसीसी क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली; परंतु भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली गुणतालिकेत घसरले आहेत. चेन्नईत बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पंतने (७३१ रेटिंग गुण) शतक झळकावले होते. तो फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे, तर सलामीवीर यशस्वी जयस्वाल (७५१) कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातील अर्धशतकाच्या जोरावर पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने अव्वल १० मध्ये आपले स्थान कायम राखले असले, तरी तो पाच स्थानांनी घसरला असून तो १० व्या स्थानावर कायम आहे. त्याचे ७१६ रेटिंग गुण आहेत. कोहलीनेही पाच स्थान गमावले असून, तो टॉप १० मधून बाहेर पडला आहे आणि आता तो १२ व्या स्थानावर आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या गॉलमधील कसोटीत प्रभात जयसूर्याने ९ बळी घेऊन खेळातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे आणि तो पाच स्थानांनी झेप घेत आठव्या स्थानावर पोहचला आहे. जयसूर्या (७४३ गुण) श्रीलंकेचा तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम रँकिंग खेळाडू आहे आणि त्याने असिथा फर्नांडोला (७००) मागे टाकले, जो दोन स्थानांनी घसरून १३ व्या क्रमांकावर आहे. कमिंडू मेंडिस फलंदाजी क्रमवारीत १६ व्या स्थानावर असून धनंजय डीसिल्वा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत १८ व्या स्थानावर आहे.
एकदिवसीय क्रमवारीत अफगाणिस्तानचा युवा स्टार रहमानउल्ला गुरबाज आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड फलंदाजी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.