पुणे : बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांच्या दमदार खेळाच्या जोरावर पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाचा पराभव करताना टी २० विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश केला. न्यूझीलंडने दिलेल्या १५३ धावांच्या आव्हानाला कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान यांनी परतून लावत अंतिम फेरीच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. अंतिम फेरीत पाकिस्तान समोर कोणता संघ असणार याचे चित्र उद्याच्या भारत व इंग्लंड यांच्या लढतीनंतर स्पष्ट होणार आहे.
न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १५२ धावा केल्या. यात डॅरिल मिचेलने धडाकेबाज ३५ चेंडूत ५३ (३ चौकार, १ षटकार) धावांची खेळी केली. त्याला कर्णधार केन विल्यमसन याने ४२ चेंडूत ४६ धावा (१ चौकार, १ षटकार) करताना सुरेख साथ दिली. शाहीन आफ़्रिदीने २ तर नवाझने एक गडी बाद केला.
पाकिस्तान संघाने १९. १ षटकांत ३ बाद १५३ धावा करताना विजय साकारला. सलामीवीर मोहम्मद रिझवानने ४३ चेंडूत ५७ (५ चौकार) धावांची तर कर्णधार बाबर आझमने ४२ चेंडूत ५३ (७ चौकार) धावांची खेळी करताना शतकी सलामी दिली. मोहम्मद हॅरिसने ३० (२ चौकार, १ षटकार) धावा करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. मसूद व इफ्तीकार अहमद यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
चौकट : भारत – इंग्लंड लढतीवर क्रीडा प्रेमींचे लक्ष..!
पहिल्या उपांत्य लढतीमध्ये पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करताना अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. दुसऱ्या बाजूला उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड लढतीवर क्रीडाप्रेमी लक्ष ठेवून आहेत. उद्या भरताने इंग्लंडला पराभूत केल्यास २००७ सालाप्रमाणेच भारत – पाकिस्तान हा अंतिम सामना होऊ शकतो. त्यावेळी भारतीय संघाने महेंद्रसिग धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वकरंडक जिंकून इतिहास रचला होता.