सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यातील कंडारी मुक्कामी उस्मानाबाद जिल्हा आजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन ३ व ४ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. हि स्पर्धा डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघन यांच्या सहकार्यातुन व कंडारी ग्रामस्थ यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आली आहे. कंडारी येथील भैरवनाथ हायस्कुलच्या मैदानावर या स्पर्धा भरवण्यात येणार आहेत.
पुणे येथे होणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा तालीम संघाने जिल्हास्तरीय यजमानपद यावर्षी परंडा तालुक्याला बहाल केले आहे. जिल्हास्तरीय निवड चाचणीत वरिष्ठ गादी व माती विभाग, कुमार गट व ग्रीकोरोमन कुस्तीतील संघाची निवड होणार आहे. यावर्षी गादी व माती विभागाचे स्वतंत्र आखाडे तयार करण्यात येणार आहेत.
कंडारी मुक्कामी उस्मानाबाद जिल्ह्यातील आजी -माजी नामवंत वस्तादांच्या यशवंत व किर्तीवंत पैलवानांच्या मर्दुमकी व पुरुषार्थाचा कुंभमेळाच ठरणार आहे . विविध पैलवानांच्या ईर्षेच्या व चुरशीच्या कुस्त्याही संपन्न होणार आहेत. या स्पर्धा म्हणजे क्रिडाशौकिन व कुस्तीप्रेमी यांच्यासाठी खेळ पर्वणी आहे.
सर्व विभागातील स्पर्धा या गादीवर होतील. तज्ञ पंच व अनुभवी ज्युरी यांचा आधार घेत कुस्तीतील सर्व अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा वापर होणार आहे . उस्मानाबाद जिल्ह्यातील कुस्ती डिजिटल करण्याचा संकल्प आहे. या स्पर्धेसाठी सामाजिक, क्रिडात्मक व राजकिय मंडळीची सुद्धा उपस्थिती लाभणार आहे. अनेक मातब्बर पैलवान मंडळी ही आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजयी पैलवानास उत्तेजनार्थ विविध बक्षीस योजना, ट्रॅकसुट, पदक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मागील नामवंत महाराष्ट्र चम्पीयन पैलवानांचाही यथोचित मान सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक डबल उपमहाराष्ट्र केसरी व श्रीउद्योग समुहाचे अध्यक्ष बाळासाहेब पडघन यांनी दिली.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त पैलवान मंडळीनी जिल्हा निवड चाचणीचा लाभ घ्यावा. भव्य – दिव्य चाचणीत पैलवानांनी कुस्ती कौशल्य व तंत्र दाखवुन महाराष्ट्राला उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करावे. महाराष्ट्र केसरी या नामांकित स्पर्धेत विविध पदकाचे मानकरी व्हावे असे आवाहन जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील, सचिव वामनराव गाते, उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघन, कार्याध्यक्ष संतोष नलावडे, माजी सभापती नवनाथ जगताप यांनी केले आहे.