लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी येथील विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या तीन दिवसीय स्पर्धेसाठी देशभरातून स्पर्धक मोठ्या संख्येने पाचगणीत दाखल झाले आहेत.
या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संचालक विराज सुरेश बिरामणे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तांत्रिक प्रतिनिधी टी पी शर्मा (क्रीडा अधिकारी), दिनेश कुमार (क्रीडा निरीक्षक), चंद्रकांत भिसे (सरचिटणीस सातारा जिल्हा) धनुर्विद्या स्पर्धा संचालिका परिलिशा पाटील तसेच विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संचालिका भारती सुरेश बिरामणे व प्राचार्य डॉ. प्रशांत होमकर यांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या आयोजनाद्वारे शहरात हा खेळ अधिक विकसित होऊन नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. विद्यानिकेतन स्कूल विविध खेळांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे.
धनुर्विद्या हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे. पांचगणीत या खेळाची राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा आयोजित करणे, ही अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारे स्पर्धक तयार होतील, असा विश्वास यावेळी विराज बिरामने यांनी व्यक्त केला.