नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा FIFA विश्वचषक २०२२ ही आजपासून कतारमध्ये सुरू होत आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या मेगा इव्हेंटमध्ये गतविजेत्या फ्रान्ससह एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत. या संघांची प्रत्येकी ४ प्रमाणे ८ गटात विभागणी करण्यात आली आहे.
FIFA World २०२२ चा उद्घाटन सोहळ्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. नोरा फतेही उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्याची शक्यता आहे.
फिफा विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा आज होणार आहे. या सोहळ्याची फुटबॉल चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा रंगारंग उद्घाटन सोहळा दोहा येथील अल बायत स्टेडियमवर होणार आहे.
या ओपनिंग सेरेमनीमध्ये भारतीय अभिनेत्री नोरा फतेही देखील परफॉर्म करणार आहे. या सोहळ्याला भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हेही उपस्थित राहणार आहेत.
यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल. हा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या निमंत्रणावरून धनखड २०-२१ नोव्हेंबर रोजी कतारला भेट देतील.
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त उपराष्ट्रपती त्यांच्या दौऱ्यात भारतीय समुदायाच्या सदस्यांनाही भेटतील.
उद्घाटन सोहळा दोहाच्या उत्तरेस ४० किमी अंतरावर असलेल्या अल बायत स्टेडियममध्ये होणार आहे. या स्टेडियमची प्रेक्षक संख्या ६० हजार इतकी आहे.
फिफा विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा भारतात Sports18 आणि Sports18 HD या चॅनेलवर वर प्रसारित केला जाईल. JioCinema अॅप आणि त्याच्या वेबसाइटवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग देखील होणार आहे.
FIFA ने २०२२ विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कलाकारांची संपूर्ण यादी अद्याप जाहीर केलेली नाही. पण दक्षिण कोरियन रॉक बँड BTS मधील ७ सदस्यांपैकी एक जंगकूक या समारंभात आपली कला सादर करेल.
याची अधिकृत घोषणा झाली आहे. तसेच, कोलंबियन पॉप स्टार शकीरादेखील फिफाच्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहे. म्युझिकल ग्रुप ब्लॅक आईड पीस, रॉबी विल्यम्स आणि भारतीय अभिनेत्री नोरा फतेही हे देखील आपली कला सादर करणार आहेत.